‘स्मार्ट गाव’साठी ग्रामपंचायत सक्षम करणार
By admin | Published: May 24, 2015 11:39 PM2015-05-24T23:39:45+5:302015-05-25T00:44:52+5:30
पंकजा मुंडे : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपक्रम राज्यात आदर्शवत; २४ व्या ‘पावनखिंड’ मासिकाचे प्रकाशन
कोल्हापूर : शहराचे वैभव वाढविण्यासाठी ‘स्मार्ट गाव ’ स्वच्छता अभियान राज्यभर राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी ग्रामपंचायत सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपक्रम राज्यात आदर्शवत आहेत. त्याचा इतर जिल्हा परिषदांनी आदर्श घ्यावा, असे गौरवोद्गार ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काढले.
जिल्हा परिषदेच्या शाहू सभागृहात रविवारी ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियान आढावा बैठकीत मंत्री मुंडे बोलत होत्या. अध्यक्षा विमल पाटील व उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार व उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी योजनांचे सादरीकरण केले. त्यानंतर योजनांची माहिती देणाऱ्या २४ व्या ‘पावनखिंड’ मासिकाचे प्रकाशन पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले.
मुंडे म्हणाल्या, सामान्य माणसांचे जीवन सुखकर कसे करता येईल, त्यासाठी विविध योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रशासन व लोकसहभाग यांच्यात समन्वय असेल तर योजना यशस्वी होते. प्रत्येक योजना यशस्वी करण्याचे नियोजन प्रत्येकाला जमतेच असे नाही. ते तुम्ही यशस्वी करून दाखविले आहे. पुरोगामी महाराष्ट्राला चांगल्या आणि सकारात्मक विचारांची गरज आहे. यापूर्वी राज्यातील पाणीपुरवठा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात
भ्रष्टाचार झाल्याने काही योजना रखडल्या आहेत. त्या मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. काही विभागांमध्ये अधिकारीच नसल्याने योजना पुढे सरकत नाहीत. त्यासाठी राज्यात सर्वच जिल्हा परिषदांतील रिक्त जागा त्वरित भरल्या जातील. त्याचबरोबर कृषी, ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावून विकासात्मक निर्णय घेतले जातील.
याप्रसंगी आरोग्य व बांधकाम सभापती सीमा पाटील, महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, शिक्षण सभापती अभिजित तायशेट्टे, समाजकल्याण सभापती किरण कांबळे यांच्यासह सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी).
पाण्याचे नियोजन करा
अडचणी खूप असतील; परंतु धनसमृद्धी असलेली ही जिल्हा परिषद आहे. तुम्ही सर्वच उपक्रमांत चांगले काम केले आहे. मी तुम्हाला काय देऊ शकते? तुमच्याकडूनच घेतले पाहिजे. कोल्हापूरमध्ये संपन्नता आहे. येथे ऊस व दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. पाणी मुबलक असल्याने त्याचा अतिवापर केला जातो. त्याचा परिणाम पिकावर होतो. पाणी हे जीवन आहे. तुमच्या पाण्याचे नियोजन तुम्ही करा, तरच जलयुक्त शिवार अभियान महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरेल.
आवाज द्या, मी तुमच्यासाठी आहे!
राज्यात मी सर्वत्र फिरले; पण कोल्हापूर ही एकमेव जिल्हा परिषद आहे, ज्यांच्याकडून मला काही शिकायला मिळाले. जनतेच्या प्रश्नांसाठी फक्त आवाज द्या, मी तुमच्यासाठी आहे. तुमच्याकडून प्रेरणा घेऊन जातेय, असे भावनिक आवाहन मुंडे यांनी यावेळी केले.
प्रलंबित विविध योजना मार्गी लावाव्यात
रिक्त पदे त्वरित भरावीत
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचा चौथा मजला बांधण्यासाठी चार कोटी ३७ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करावी.
ग्रामविकास विभागासाठी आयुक्तालय सुरू करावे.
निवासी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद निर्माण करावे.
प्रलंबित प्रश्नांसंदर्भात विशेष बैठक
ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांनी जिल्हा परिषदेच्या प्रलंबित प्रश्नांचा पाढा वाचला. यावेळी त्यांनी ‘ताई, तुम्ही आमच्या पालक आहात; त्यामुळे आमच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण कराव्यात,’ अशी मागणी केली. त्यावर मुंडे यांनी ‘तुमच्या प्रश्नांची मला जाणीव आहे. त्यासाठी लवकरच इतर खात्यांचे मंत्री, प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांची विशेष बैठक मुंबईत बोलावून प्रश्न मार्गी लावले जातील,’ अशी ग्वाही देताच सदस्यांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात आभार मानले.