‘दारुबंदी’चा सक्षम कायदा होणार
By admin | Published: November 7, 2016 01:31 AM2016-11-07T01:31:28+5:302016-11-07T01:31:28+5:30
दारूमुळे खेड्यापाड्यांमध्ये महिलांवर अन्याय होत आहेत. शाळेतल्या मुलींवरही अत्याचार होत आहेत. त्यामुळे ‘दारुबंदी’चा सक्षम कायदा करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली
पुणे : दारूमुळे खेड्यापाड्यांमध्ये महिलांवर अन्याय होत आहेत. शाळेतल्या मुलींवरही अत्याचार होत आहेत. त्यामुळे ‘दारुबंदी’चा सक्षम कायदा करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली असून, दारू पिणाऱ्याला आणि बनवणाऱ्याला तडीपारीची कठोर शिक्षा त्यात असेल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी येथे सांगितले.
सजग नागरिक मंच या माहिती अधिकार क्षेत्रातील संस्थेच्या दशकपूर्ती मेळाव्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत
होते. निवृत्त केंद्रीय सचिव माधव गोडबोले प्रमुख पाहुणे होते. मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर, कार्यकारी विश्वस्त जुगल राठी,
विश्वस्त विश्वास सहस्रबुद्धे व्यासपीठावर होते.
हजारे यांच्या या वक्तव्याचे नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. हजारे म्हणाले, ‘‘दारुबंदीचा कडक कायदा करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. माधवराव गोडबोले यांच्यासमवेत कायद्याचा मसुदा बनविला जात आहे. मी, मला, माझे असेच आत्मकेंद्रित वातावरण आहे. काहीजण तर दुसऱ्याचे तेही माझे असे म्हणणारे आहेत. अशा वातावरणात निरपेक्ष भावनेने समाजासाठी काम करणाऱ्या सजग नागरिक मंचसारख्या संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. अशा संस्था जागोजाग निर्माण झाल्या पाहिजेत,’’
ते म्हणाले, ‘‘पार्टीशाहीने खरी लोकशाही रुजू दिलेली नाही. सरकार घाबरते पराभवाला. ते पाडण्याची शक्ती येणार नाही, तोपर्यंत खरी लोकशाही येणार नाही. गावात आलेला पैसा खर्च करण्यापूर्वी ग्रामसभेत निर्णय करावा, असे अभिप्रेत आहे. ग्रामसभा सर्वश्रेष्ठ आहे, पण लोकांना तिचे महत्त्वच समजलेले नाही. ’’
माहिती अधिकार कायद्यासाठी जनतेचे केलेले संघटन, १९९७ पासून २००६ पर्यंत दिलेला लढा. कायदा लागू झाल्यानंतर, त्यात बदल करण्यासाठी केंद्र सरकारने केलेला प्रयत्न, त्याविरोधात आळंदीत केलेले उपोषण यांचा ऊहापोह करून हजारे यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना मध्यस्थी करण्यासाठी पाठविल्याची व कायद्यात बदल केला जाणार नाही, असे लेखी आश्वासन आपण त्यांच्याकडून घेतल्याची आठवण सांगितली. अजूनही या कायद्यामध्ये काही त्रुटी असल्याचे त्यांनी सांगितले.
माहिती अधिकार कायदा खासगी संस्थांनाही लागू झाला पाहिजे, अशी मागणी गोडबोले यांनी यावेळी केली. वेलणकर लिखित ‘ग्राहकराजा जागा हो’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले. सजग नागरिक मंच व पीएमपी प्रवासी मंचसाठी लक्षणीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार हजारे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.
(प्रतिनिधी)