Encounter In Gadchiroli: 'आमच्या पोलिसांचा मला अभिमान'; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले गडचिरोली पोलीस दलाचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 08:44 PM2021-11-13T20:44:58+5:302021-11-13T20:45:58+5:30
Encounter In Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री Dilip Walse-Patil यांनी प्रशंसा केली आहे."आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे," अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले.
मुंबई - गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे."आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे," अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले.
आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या सी-६० दलाने मिळालेल्या माहितीआधारे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली. या कामगिरीबद्दल महाराष्ट्र विशेषतः गडचिरोली पोलिसांचे गृहमंत्र्यांनी मनपूर्वक अभिनंदन केले आहे.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांकडून नक्षलवाद्यांविरोधात राबण्यात येणाऱ्या अभियानाला आज मोठं यश मिळालं आहे. आज सकाळपासून जिल्ह्यातील उत्तर-पूर्व भागातील छत्तीसगड सीमेजवळील परिसरात सुरू असलेल्या चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले आहे. या चकमकीमध्ये नक्षलवाद्यांचा एक मोठा नेता मारला गेल्याचीही चर्चा आहे. मात्र त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
गडचिरोलीमधील छत्तीसगडच्या सीमेवर आज सकाळपासूनच चकमकीला सुरुवात झाली होती. या चकमकीमध्ये पोलिसांनी नक्षलवाद्यांना घेरून नक्षलवाद्यांचे शिबिर उद्ध्वस्त केले. यावेळी झालेल्या गोळीबारात तब्बल २६ नक्षलवादी ठार झाले. तर सुरक्षा दलांचे चार जवान जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी नागपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठार झालेल्या २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.