एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा ठाण्यामध्ये झाले कामावर रूजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 08:59 PM2017-08-23T20:59:46+5:302017-08-23T21:00:14+5:30
चकमक फेम अधिकारी म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा बुधवारी ठाणो पोलीस आयुक्तालयात रूजू झाले. खंडणीविरोधी पथकाची जबाबदारी त्यांना दिली जाण्याची शक्यता आहे.
ठाणे, दि. 23 - चकमक फेम अधिकारी म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा बुधवारी ठाणो पोलीस आयुक्तालयात रूजू झाले. खंडणीविरोधी पथकाची जबाबदारी त्यांना दिली जाण्याची शक्यता आहे. यावेळी बोलताना, ठाणे पोलीस आयुक्तालयात आज रूजू झालो. अद्याप कुठे पदस्थापना देण्यात आलेली नाही. गुरूवारपर्यंत निश्चित जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे असं प्रदीप शर्मा म्हणाले.
1983 साली महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रूजू झालेल्या प्रदीप शर्माची कारकीर्द माहिम पोलीस ठाण्यापासून सुरू झाली. शंभरपेक्षा जास्त गुन्हेगारांना चकमकीत ठार केल्याने शर्माची ओळख सर्वदूर पोहोचली होती. गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याच्या आरोपाखाली 2008 साली त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. या आरोपातून दोषमुक्त झाल्यानंतर 2009 साली ते पुन्हा सेवेत रूजू झाले. जानेवारी 2010 मध्ये लखनभैय्या बनावट चकमक प्रकरणामध्ये शर्मासह 13 पोलिसांना अटक करण्यात आली होती. जुलै 2013 मध्ये न्यायालयाने त्यांना या प्रकरणातूनही दोषमुक्त केले. गत आठवडय़ात ते मुंबई येथे पोलीस मुख्यालयात रूजू झाले होते. तेव्हापासूनच त्यांची पदस्थापना ठाण्यात होणार असल्याची चर्चा होती. बुधवारी ती चर्चा खरी ठरली.