नवसाहित्यिकांना प्रोत्साहन द्यावे!

By Admin | Published: March 14, 2016 01:52 AM2016-03-14T01:52:34+5:302016-03-14T01:52:34+5:30

राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाचे वाजले सूप; समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांचे अवाहन.

Encourage novelty! | नवसाहित्यिकांना प्रोत्साहन द्यावे!

नवसाहित्यिकांना प्रोत्साहन द्यावे!

googlenewsNext

बुलडाणा : साहित्यसृष्टी सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी व नवसाहित्यिक घडविण्यासाठी अशा प्रकारच्या साहित्य संमेलनाची नितांत आवश्यकता आहे. महाराष्ट्रात कितीही नैसर्गिकदृष्ट्या दुष्काळाची स्थिती असली तरी साहित्याच्या क्षेत्रात मात्र प्रचंड सुकाळ आहे. या प्रतिभेला प्रोत्साहन देऊन ती फुलविण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगानेच दुर्लक्षित आणि गौरवान्वित प्रतिभांचा पहिल्या राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनात संगम घडून आल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
बलडाण्यातील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात स्थापन करण्यात आलेल्या संत चोखामेळा साहित्य परिसरात १२ मार्चपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी मान्यवरांनी मत व्यक्त केले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. एस. एम. कानडजे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संमेलनाचे अध्यक्ष दा.सु. वैद्य, सुप्रसिद्ध कवी प्रसाद कुळकर्णी, विदर्भाचे साने गुरुजी म्हणून लौकिक असलेले बालसाहित्यिक शंकर कराडे, ज्येष्ठ साहित्यिक गो. या. सावजी, संमेलनाच्या स्वागताध्यक्ष अरुणा कुल्ली, संयोजक नरेंद्र लांजेवार उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमात बोलताना दा.सु. वैद्य म्हणाले, की बुलडाणा येथे पार पडलेल्या बालकुमार युवासाहित्य संमेलनात अनेक प्रकारच्या प्रतिभांचा संगम दिसून आला. हा साहित्यिक प्रतिभेचा एक आविष्कार आहे. खरं म्हणजे साहित्यात रंजन, भंजन आणि निरंजन होणे आवश्यक आहे. नवलेखकांची प्रतिभा यासारख्या साहित्य संमेलनातून आणखी समृद्ध होईल आणि त्यातूनच साहित्य क्षेत्रात सृजनाचा उत्सव खर्‍या अर्थाने प्रारंभ होईल, असे सांगून ह्यऐल राहू पैल जाऊ, पात्र सारे कोरडे.. शब्द देऊ शब्द घेऊ, अर्थ सारे सापडेह्ण या काव्यातून त्यांनी या साहित्य संमेलनातून यापुढे होणार्‍या प्रतिभेचा निरंतर प्रवास सुरू होईल, असे सांगितले. याप्रसंगी बोलताना प्रा.डॉ.एस.एम. कानडजे म्हणाले, की या साहित्य संमेलनामध्ये साहित्याच्या घुसळणीतून नवलेखकांच्या प्रतिभेला नवे धुमारे फुटतील व त्यातून अत्यंत दर्जेदार साहित्यनिर्मिती होईल. पहिल्या राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाचा प्रारंभ (ओनामा) साहित्याची समृद्ध परंपरा असलेल्या बुलडाणा नगरीत झाल्याचा उल्लेख पुढील काळात सातत्याने होत राहील, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन संमेलनाचे संयोजक नरेंद्र लांजेवार यांनी केले. पंजाबराव गायकवाड यांनी आभार मानले. संमेलनाला सहकार्य करणार्‍यांचा तसेच पत्रकारांचा यावेळी स्मृतिचिन्ह, पुस्तक, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

संमेलनात पाच ठराव पारित
या संमेलनात एकूण पाच ठराव घेण्यात आले. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याला माँ जिजाऊंच्या नावे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, देशातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी बालकांच्या सांस्कृतिक व साहित्यिक विकासासाठी बालभवन निर्माण केले जावे. राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाकडून साहित्य प्रकाशित करण्यासाठी देण्यात येणार्‍या अनुदानामध्ये वयाची अट शिथिल करण्यात यावी, जेणेकरून १८ वर्षाखालील बालसाहित्यिकांनाही त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यास मदत होईल, विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता या भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ केले जावे, शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवारातील मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारावी, असे ठराव पारित करण्यात आले.

Web Title: Encourage novelty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.