संमेलनांमुळे नव्या डॉक्टरांना लिहिण्याची प्रेरणा!
By Admin | Published: February 7, 2016 01:16 AM2016-02-07T01:16:54+5:302016-02-07T01:16:54+5:30
वैद्यकीय साहित्य संमेलने आवश्यक असून त्यामुळेच नव्या डॉक्टरांनाही लिहिण्याची प्रेरणा मिळू शकेल, असे प्रतिपादन येथे आयोजित पहिल्यावहिल्या शब्दांगण वैद्यकीय साहित्य
धुळे : वैद्यकीय साहित्य संमेलने आवश्यक असून त्यामुळेच नव्या डॉक्टरांनाही लिहिण्याची प्रेरणा मिळू शकेल, असे प्रतिपादन येथे आयोजित पहिल्यावहिल्या शब्दांगण वैद्यकीय साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षा डॉ.अलका मांडके यांनी केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या धुळे शाखेतर्फे कवयित्री बहिणाबाई नगरी (आयएमए सभागृह) येथे आयोजित या संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून अ.भा.नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर, खासदार डॉ.सुभाष भामरे, आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रवी वानखेडकर, माजी अध्यक्ष डॉ.अशोक आढाव, डॉ.अविनाश भोंडवे, डॉ.अशोक तांबे, डॉ.रवींद्र टोणगावकर, सुषमा दाते, आयएमए धुळे शाखाध्यक्ष डॉ.मीना वानखेडकर उपस्थित होते. भूलतज्ञ असल्याने माझा तसा रूग्णांशी फार संबंध येत नाही. परंतु डॉ.नितू मांडके रुग्णांशी ओळखून बरोबर त्याच्या भाषेत बोलायचे. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी तयार नसणारा रूग्ण त्यासाठी तयार व्हायचा. त्यामुळे डॉक्टरांनी रूग्णांशी त्याच्या बोली भाषेतूनच संवाद साधावा, अशी अपेक्षा डॉ.अलका मांडके यांनी व्यक्त केली. डॉक्टरांचा वेदना, दु:ख, समस्या यांच्याशी सर्वाधिक संबंध येतो.
या गोष्टी चांगल्या साहित्याच्या निर्मितीसाठी आवश्यक मानल्या जातात. त्यामुळे डॉक्टरच चांगले लिहू शकतात, कसदार साहित्य निर्मितीची क्षमता त्यांच्यात असते, असे प्रमुख अतिथी गंगाराम गवाणकर यांनी सांगितले.
यावेळी डॉक्टरांनी लिहिलेल्या चार पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यात डॉ.वर्षा सिधये यांचे ‘रंगोत्सव’, डॉ.अमित बिडवे यांचे दिल..दोस्ती..डॉक्टरी, डॉ.अलका कुलकर्णी अनुवादित ‘भुलवा’ (हिंदी) व डॉ.रवींद्र टोणगावकर लिखीत ‘माझी अध्यात्मिक वाटचाल-गुढाकडून वास्तवाकडे’ या पुस्तकांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
आता दरवर्षी
भरणार ‘शब्दांगण’!
खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी रोज मोठ्या संख्येने रूग्णांशी उपचाराच्या माध्यमातून संवाद साधणाऱ्या डॉक्टरांकडे एखाद्या लेखकापेक्षाही दांडगा अनुभव असतो. त्यामुळे आयएमएने दरवर्षी ‘शब्दांगण’ भरवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यास आयएमएने समर्पक प्रतिसाद देत, वैद्यकीय साहित्य परिषदेची स्थापना करण्यात आल्याची घोषणा करुन लवकरच त्याबाबत पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.