निवासस्थानच्या जागेवर अतिक्रमणाचा प्रकार उघड; उल्हासनगरात पोलीस निवासस्थानच्या जागा असुरक्षित?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 07:25 PM2022-01-09T19:25:44+5:302022-01-09T19:26:04+5:30
शहरात खुल्या जागा, आरक्षित भूखंड आदींवर अतिक्रमणाचा विळखा पडत असताना पोलिसांच्या जागाही सुरक्षित राहिल्या नसल्याचे उघड झाले.
सदानंद नाईक
शहरात खुल्या जागा, आरक्षित भूखंड आदींवर अतिक्रमणाचा विळखा पडत असताना पोलिसांच्या जागाही सुरक्षित राहिल्या नसल्याचे उघड झाले. हिललाईन पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील शासकीय पोलीस निवासस्थान जागेवर होणारा अतिक्रमणाचा प्रकार उघड होऊन पोलिसांनी एका बापलेकावर गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेचे शहर असून जागेला सोन्याचा भाव आल्याने जागेवर अतिक्रमण होण्याच्या प्रकारात वाढ झाली. शहरातील असंख्य खुल्या जागा, आरक्षित भूखंडावर यापूर्वीच अतिक्रमण झाले असून भूमाफियांची नजर शासकीय बंद कार्यालये, त्यांचे खुल्या जागा, उद्याने, शाळा इमारती यांच्यावर गेली आहे. दोन वर्षांपूर्वी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या समोर व मुख्य रस्त्याला लागून पोलीस निवासस्थान असून ते धोकादायक झाल्याने, काही वर्षांपासून बंद होते. या बंद पोलीस निवासस्थानच्या जागी प्रांत कार्यालयाने एका इसमाला विना चौकशी करता सनद दिली. त्या इसमाने कामगार लावून बंद पोलीस निवासस्थानातून लाकडे, कौले, लोखंडी साहित्य, दरवाजे, खिडक्या ट्रक आणून नेत होते. सदर प्रकार स्थानिक नगरसेवक धनंजय बोडारे यांच्या लक्षात आल्यावर, अतिक्रमणाचा प्रकार उघड झाला.
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी धावाधाव करून पोलीस निवासस्थानाची कागदपत्रे प्रांत अधिकारी यांना दाखविली. त्यानंतर दिलेली सनद रद्द करून त्या जागेची सनद विठ्ठलवाडी पोलिसांना देण्यात आली. दोन दिवसांपूर्वी हिललाईन पोलीस ठाण्याला लागून शासकीय पोलीस निवासस्थान आहे. पोलीस निवासस्थानातील घराची वेळोवेळी दुरुस्ती व देखभाल झाले नसल्याने, काही घरे धोकादायक झाली आहेत. एका बापलेकांला अतिक्रमणाचा उद्देशाने जागेची मोजणी करीत असताना, पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला. विठ्ठलवाडी व हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस निवासस्थाना बाबत घडलेला प्रकार इतर पोलीस निवासस्थान जागे बाबत होण्याची शक्यता आहे. पोलीसांच्या जागेवर अतिक्रमण होत असेलतर, शहरातील इतर जागेचे काय होत असेल? असा प्रश्न शहरात विचारला जात आहे.