व्याघ्र अधिवास असलेल्या जंगलातील अतिक्रमण हटवले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 05:37 PM2023-04-05T17:37:21+5:302023-04-05T17:37:21+5:30
तालुक्यातील व्याघ्र अधिवास असलेल्या वडोदा-डोलारखेडा वनपरिमंडळाच्या हद्दीत गेल्या दहा वर्षांपासून असलेल्या ३४ झोपड्या व पक्के अतिक्रमण हटविण्यात आले.
विनायक वाडेकर/ मुक्ताईनगर
मुक्ताईनगर, जि. जळगाव :
तालुक्यातील व्याघ्र अधिवास असलेल्या वडोदा-डोलारखेडा वनपरिमंडळाच्या हद्दीत गेल्या दहा वर्षांपासून असलेल्या ३४ झोपड्या व पक्के अतिक्रमण हटविण्यात आले. बुधवारी या अतिक्रमित भागात बुलडोझर फिरविण्यात आला.
सन २०१२-१३ पासून डोलारखेडा वनविभागाच्या नांदवेल शिवारातील अनेक जणांनी झोपड्या बांधून अधिवास केला होता. दरम्यान, सन २०१७ मध्ये नांदवेल गटाचे तत्कालीन जि. प. सदस्य नीलेश पाटील यांनी याबाबत लेखी तक्रार दिली होती. यावर वनविभागाकडून चौकशीसह इतर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मागील काही महिन्यांपूर्वी भूमी अभिलेख व वनविभागाकडून संयुक्त मोजणी करून हद्द निश्चित करण्यात आली होती. यादरम्यान संबंधित अतिक्रमणधारकांना जागा खाली करून देण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांच्याकडून काहीएक प्रतिसाद मिळत नव्हता.
बुधवारी अतिक्रमण काढले जाणार असल्याचे कळताच काही जणांनी स्वत:हून आपापल्या झोपड्या खाली केल्या. दोन जेसीबी मशीनच्या साहाय्याने एक पक्के घर व ३४ झोपड्या अशा १ हेक्टर ६० आर जागेतील अतिक्रमण काढण्यात आले.