शिवसेनेच्याच हाती युती सरकारचा शेवट
By admin | Published: July 12, 2015 04:27 AM2015-07-12T04:27:49+5:302015-07-12T04:27:49+5:30
राज्यात सुमारे १५ वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँंग्रेसमधील मतभेद पहिल्या पाच वर्षात कधीच चव्हाट्यावर आले नाहीत. मात्र अवघ्या आठ महिन्यांपूर्वी राज्यात
- अजित पवारांचा टोला
पुणे : राज्यात सुमारे १५ वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँंग्रेसमधील मतभेद पहिल्या पाच वर्षात कधीच चव्हाट्यावर आले नाहीत. मात्र अवघ्या आठ महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेत असलेल्या युतीच्या सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याने शिवसेनेच्या नेतृत्वाकडून वारंवार सरकारवर टीका केली जात आहे. ज्या दिवशी सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे वेगळा निर्णय घेतील, त्यांच्या मनात वेगळी भावना येईल, तो दिवस या सरकारचा शेवटचा दिवस असेल, असे भाकीत राष्ट्रवादीचे विधिमंडळातील पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी येथे केले.
एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी असेही सांगितले की, सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात महत्त्वाच्या प्रश्नांवरून सरकारला घेरण्यासाठी
राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र रणनीती आखेल. पवार म्हणाले, की आमच्यातही मतभेद होते, मात्र ते नागरिकांच्या प्रश्नावर होते. अखेरच्या पाच वर्षांत काही मतभेद झाले, तरी राज्याचा विकास आणि नागरिकांचे हित जपण्याचा प्रयत्न कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला. नव्या सरकारमधील मतभेद एवढ्यातच चव्हाट्यावर आले
आहेत. शिवसेनेच्या मुखपत्रातूनच सरकारच्या अनेक निर्णयांवर
जाहीर टीका केली जात आहे.
त्यामुळे या सरकारचे भवितव्य उद्धव ठाकरेंच्या एका निर्णयावर अवलंबून असेल.
सरकारला एकत्रितपणे घेरणार सात महिन्यांत शासनाने घेतलेल्या निर्णयावर तसेच राज्यातील ऊस, कापूस, धान्य, दूध उत्पादक शेतकरी सरकारच्या आर्थिक मदतीविना हवालदिल झाला आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली असून, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.
या प्रत्येक गोष्टीचा हिशोब सरकारला विचारला जाईल. त्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस समविचारी असल्याने पुन्हा एकत्र येऊन सरकारला घेरणार असल्याचे पवार म्हणाले. यासाठी रविवारी मुंबईत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. अधिवेशनातील विरोधकांची भूमिका ठरविली जाईल असेही त्यांनी सष्ट केले.
स्वतंत्र सोशल मीडिया सेल
राष्ट्रवादीकडूनही सोशल मीडियावर सक्रिय होण्यासाठी स्वतंत्र सेल तयार केला असून, त्याची जबाबदारी इंजिनीयर असलेले माजी खासदार आनंद परांजपे यांच्याकडे देण्यात आली आहे. ते खरोखरच इंजिनीयर झालेले आहेत, अशा शब्दांत पवार यांनी नाव न घेता शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची खिल्ली उडविली. आपण स्वत: लवकरच सोशल मीडियावर सक्रिय होणार असल्याचेही ते म्हणाले.