प्रवेश प्रक्रिया संपता संपेना
By admin | Published: September 20, 2016 02:57 AM2016-09-20T02:57:05+5:302016-09-20T02:57:05+5:30
गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्याप संपलेली नाही.
मुंबई : गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्याप संपलेली नाही. दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळाला नसल्याचे कारण देत सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयालबाहेर गर्दी केली होती.
यावेळी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, गुणपत्रिका मिळाली नसल्याने प्रवेश अर्जच भरला नसल्याचे कळाले तर काहींनी चुकीचा अर्ज भरल्याने प्रवेशापासून वंचित राहिल्याचे सांगितले. ज्या विद्यार्थ्यांनी एकदाही प्रवेश प्रक्रियेत भाग घेतलेला नाही किंवा अर्ज केल्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही, त्यांची यादी तयार केली जात आहे. ही यादी शिक्षणमंत्री आणि एमकेसीएलला पाठवण्यात येईल.
त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश कशाप्रकारे देता येईल, यावर मंगळवारनंतर निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली.
चव्हाण म्हणाले की, फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांचे नाव प्रवेशयादीत आलेले नाही, त्यांनी उपसंचालक कार्यालयात नावनोंदणी करावी. मुंबई महानगर क्षेत्रात अनेक महाविद्यालयांत रिक्त जागा आहेत. त्याठिकाणी त्यांना आॅनलाईन प्रक्रियेतून सामावून घेतले जाईल. याआधी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश बदलासाठी अर्ज किंवा नोंदणी करू नये, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)