एका युगाचा अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 05:48 AM2018-05-07T05:48:44+5:302018-05-07T05:48:44+5:30
अरुण दाते यांच्या काळातील गाणी असे म्हणण्यापेक्षा दाते हे स्वत:च एक युग होते. कुठल्याही प्रसंगात दाते यांची गाणी चपखल बसायची. ‘अर्ध्यावरती डाव मोडला...’ हे गाणे किती ठिकाणी वापरले आहे, या गाण्याची ताकदच निराळी. आवाजातून भावना व्यक्त करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे गाणी मनामनात रुजली. दाते यांनी जे गावोगावी कार्यक्रम केले, ते सोपे नव्हते. ३०-४० वर्षांपूर्वी मूलभूत सोयी-सुविधा नसताना महाराष्ट्रातल्या गावागावांत कार्यक्रम केले, त्यातून दाते यांनी गाणी रुजविली.
- सलील कुलकर्णी

योगायोगाने पुण्यात असताना आम्ही एकाच इमारतीत राहायचो. त्या इतक्या वर्षांच्या सहवासात रोज भेट व्हायची, पण कधीच चेहरा पडलेले दातेकाका पाहिलेले नाही. चिडलेले, दुर्मुखलेले दातेकाका कधीच नसायचे. १९९८ ला माझ्या पहिल्या अल्बमचे अनावरण दातेकाकांच्या हस्ते झाले होते. त्या वेळी त्यांनी शाबासकी देताना म्हटले होते, स्वत:चे गाणे घेऊन स्वत:ची वाट शोधणारे खूप आवडतात अन् तुझा तोच प्रयत्न आहे. ‘हुरहुर असते तीच उरी...’ या गाण्याला त्यांनी दिलेली दाद अविस्मरणीय आहे. एका कार्यक्रमात मी गायल्यानंतर त्यांचा फोन आलेला. ‘अरे यार... क्या बात है’ अशी इंदोरी पद्धतीने दिलेली दाद कायमच लक्षात राहील. त्यांचा आवाज हा गझल गायनासाठी परफेक्ट होता, मात्र मराठी भावसंगीताचं भाग्य म्हणून ते याच क्षेत्रात राहिले. त्यांच्या गाण्यातला हळवेपणा स्वभावात होता. तो हळवेपणा त्यांची पत्नी गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर पाहिला होता. दातेकाकांसारख्या माणसाचे ‘असणे’ही खूप असते, म्हणजे ते आजारी असले तरी त्यांचे अस्तित्वही आधार देणारे होते. त्यांचे जाणे हे पोरके करणारे आहे.
(शब्दांकन : स्नेहा मोरे)