"सामना" संपणार? अमित शहा भेटणार उद्धव ठाकरेंना
By admin | Published: June 15, 2017 09:51 AM2017-06-15T09:51:00+5:302017-06-15T10:05:36+5:30
अमित शहा तीन दिवसाच्या मुंबई दौ-यावर येणार असून यावेळी ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याचे वृत्त आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तीन दिवसाच्या मुंबई दौ-यावर येणार असून यावेळी ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार असल्याचे वृत्त एबीपी माझा वृत्त वाहिनीने दिले आहे. शिवसेना सातत्याने सरकार विरोधी भूमिका घेऊन भाजपाची कोंडी करत असल्याने युतीच्या संबंधात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर दोन्ही पक्षप्रमुखांची ही भेट होत आहे.
शिवसेना भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये सहभागी असली तरी, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाला साथ देण्याचे कोणतेही आश्वासन शिवसेनेने दिलेले नाही. आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाला शिवसेनेच्या मदतीची गरज पडणार आहे. तेच या भेटीमागे खरे कारण असल्याचे राजकीय जाणकरांनी सांगितले. शिवसेनेचा पाठिंबा महत्वाचा असल्याने भाजपा शिवसेनेला अजिबात दुखावू इच्छित नाही.
मागच्या काही दिवसात शिवसेनेच्या नेत्यांनी जाहीरपणे भाजपावर टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखातूनही सातत्याने नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका सुरु आहे. पण भाजपाने नरमाईची भूमिका घेत या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलेले नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा हेच त्यामागे खरे कारण आहे. यापूर्वी सलग दोनवेळा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने एनडीमध्ये असतानाही काँग्रेसला साथ दिली होती.
यावेळी असे घडू नये यासाठी भाजपाने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अमित शहा यांची मातोश्री भेट हा त्याच रणनितीचा एक भाग आहे. केंद्रात नरेंद्र मोदी आणि भाजपाची सूत्रे अमित शहा यांच्या हाती आल्यापासून शिवसेना-भाजपा परस्परांपासून अधिक दुरावले. भाजपानेही सत्तेतील वाटा देण्यावरुन शिवसेनेची शक्य होईल तितकी कोंडी केली. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांच्या हाती पक्षाची धुरा असताना नेहमीच शिवसेना-भाजपा संबंध सलोख्याचे राहिले. मतभेद निर्माण झाले तरी, संबंध तुटेपर्यंत कधीच ताणले गेले नाहीत. मुंबई दौ-यात अमित शहा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजीपार्क येथील स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन करणार असल्याचीही माहिती आहे.