एका कलापर्वाचा अंत..!
By admin | Published: July 24, 2016 04:47 AM2016-07-24T04:47:27+5:302016-07-24T04:47:27+5:30
रझा हे आयुष्यभर विविध शैलीत प्रयोगशील काम करत मापदंड निर्माण करत राहिले. विद्यार्थी दशेत त्यांनी सर्वच विषयांत जे प्राविण्य मिळविले त्याचा अत्यंत प्रभावी असा वापर पुढील आयुष्यात सातत्याने
- सुहास बहुळकर
रझा हे आयुष्यभर विविध शैलीत प्रयोगशील काम करत मापदंड निर्माण करत राहिले. विद्यार्थी दशेत त्यांनी सर्वच विषयांत जे प्राविण्य मिळविले त्याचा अत्यंत प्रभावी असा वापर पुढील आयुष्यात सातत्याने चिंतन आणि प्रयोगशीलतेची जोड देत केला. स्वातंत्र्योत्तर काळातील रझा यांच्या निसर्गचित्रांतून अत्यंत उस्फूर्त, मनस्वी आणि प्रभावी रंगलेपनाचा वापर केलेला आढळतो. मग ती चित्रे काश्मीरसारख्या निसर्गरम्य प्रदेशाची असो वा मुंबईतल्या फोर्ट विभागाची. ज्या सामर्थ्याने ते निसर्ग रंगवित त्या सामर्थ्याने मुंबईतील ब्रिटीशकालीन इमारती, रस्ते, मोटारी, ट्राम आणि माणसंही रंगविली.
या दरम्यान, रझा प्रोगेसिव्ह आर्टिस्ट ग्रूपमध्ये सहभागी झाले. त्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यातून प्रयोगशीलतेकडे झालेली वाटचाल व निसर्गाचा वेगळ््या प्रकारेघेतलेला शोध यातून त्यांचे वेगळेपणं सिद्ध करत गेले.१९५०-५३ या काळात रझा यांनी ‘इकोल नॅशनल सुपिरिअर द ब्ल्यू आर्ट’ कला संस्थेत शिक्षण घेतले. १९५१-६० या काळातील त्यांच्या चित्रांत पाश्चात्य कलेतील ‘क्युबिझम’ आणि ‘एक्सप्रेशनिझम’चा प्रभाव दिसतो.१९६१-७० या काळात रझा यांचे रंगांविषयी आकर्षण वाढत गेले. १९७० च्या दरम्यान त्यांच्या चित्रांत भारतीय तांत्रिक प्रतिमा व अक्षरांचा वापर होऊ लागला. त्यातूनच रझा यांची भारतीयत्त्वाचा शोध घेणारी व पुढील काळात नवनवीन विक्रम करणाऱ्या चित्रांकडे वाटचाल सुरु झाली.
भौमितिक आकारांच्या वापरातून त्यांची चित्रे निर्माण होऊ लागली. या चित्रांमधून परदेशी राहणाऱ्या रझांची आपल्या मातृभूमीबद्दलची ओढ व्यक्त होत होती. त्यातून ‘नादबिंदू’, ‘जलबिंदू’, ‘शांतीबिंदू’ व ‘ओ माँ’ यांसारखी चित्रे निर्माण झाली.देशातील व परदेशातील सर्वोच्च सन्मान मिळालेल्या रझांची सर्वच महत्त्वांच्या कलादालनात झालेल्या प्रदर्शनांमधून रझा हे नाव जगभर पोहोचले.
२०१० मध्ये रझा पॅरिसमधून भारतात परतले. रझा फाउंडेशनच्या रुपाने त्यांनी अनेक तरुण चित्रकारांना प्रोत्साहन दिले. मध्यप्रदेश शासनाचा ‘कालिदास’ पुरस्कार मिळवणाऱ्या रझा यांना पद्मश्री व पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारही मिळाले होते. एवढचे
नव्हे तर १९५६ मध्ये पॅरिसचे ‘प्री द ला क्रिटीक’ हा पुरस्कार मिळवणारे
रझा हे स्वातंत्र्योत्तर काळातील नवनवोन्मेष व प्रयोगशील चित्रनिर्मिती करणाऱ्या चित्रकारांचे प्रतिनिधीत्त्व करणारे महत्त्वाचे चित्रकार होते.
अखेरपर्यंत ते कार्यरत होते. त्यांच्या रुपाने एक अत्यंत महत्त्वाचा आधुनिक काळातील भारतीय कलावंत आज आपल्यातून वृद्धापकाळात निघून गेला आहे. परंतु, त्यांच्या कला निर्मितीतील प्रभुत्त्व, प्रयोगशीलता, चैतन्य आणि विलक्षण आविष्कार कलारसिकांना कायमच आनंद देतील आणि त्यांचे जीवन हे तरुण कलावंतांसाठी नेहमीच प्रेरणादायक असेल.