शिक्षक बदल्यांचा गोंधळ संपेना
By admin | Published: May 18, 2016 09:40 PM2016-05-18T21:40:05+5:302016-05-18T21:40:05+5:30
जिल्ह्यांतर्गत आॅनलाईन शिक्षक बदलीतील गोंधळ सुरूच आहे. शिक्षण विभागाच्या यादीतील चुकांमुळे दुसऱ्यांदा बदलीसाठी मुदतवाढ देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
पुन्हा मुदतवाढ : समायोजन दुरुस्तीत ६७ शिक्षक वाढले
पुणे : जिल्ह्यांतर्गत आॅनलाईन शिक्षक बदलीतील गोंधळ सुरूच आहे. शिक्षण विभागाच्या यादीतील चुकांमुळे दुसऱ्यांदा बदलीसाठी मुदतवाढ देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. बदली प्रक्रियेत पारदर्शकता राहावी व शासनाने मुदत वाढवून दिल्याने मुदतवाढ देत असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे अध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांनी सांगितले.
यानुसार आता २७ व २८ मे रोजी ही प्रक्रिया राबविण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या १० टक्के जिल्ह्यांतर्गत प्रशासकीय बदल्यांना राज्य सरकाने परवानगी दिली आहे. त्यामध्ये प्रशासकीय व विनंती बदल्यांचा समावेश आहे. त्यानुसार इतर सवर्गातील बदल्या सुरळीत पूर्ण झाल्या आहेत. शिक्षक व ग्रामसेवक या महत्त्वाच्या बदल्या बाकी आहेत. सामान्य प्रशासनाने बदल्यांच्या ठरविलेल्या वेळापत्रकानुसार १२ मेपासून ही बदल्यांची प्रक्र्रिया राबविण्याचे ठरविले होते. शुक्रवारी १३ मे रोजी २० बदल्यांसाठी ९१ शिक्षकांना बोलावलण्यात आले. प्रत्यक्षात १ हजार शिक्षक उपस्थित राहिले; त्यामुळे गोंधळ उडाला. अखेर जिल्हा परिषद अध्यक्षांनी लक्ष घालून या बदल्या थांबविल्या व नवे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार २० व २१ रोजी नव्याने प्रकिक्रया राबविण्याचे ठरले होते.
यानुसार शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना तीन दिवस शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यास वेळ दिला. मात्र, बुधवार (१६ मे)पर्यंत काही तालुक्यांच्या याद्या आल्या व काही तालुक्यांच्या आल्याच नाहीत. तसेच, प्रत्येकाने वेगवेगळ्या फॉन्टमध्ये याद्या पाठविल्याने त्या एकत्र करताना पुन्हा गोंधळ झाला. दोन दिवसांवर बदली प्रक्रिया असताना अजून यादीतील गोंधळ दूर होत नाही. तसेच, शासनाने या प्रकियेला ५ जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याने शुक्राचार्य वांजळे यांनी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्याशी चर्चा करून यापुढे त्यात कोणतीही चूक राहू नये म्हणून पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
यानुसार आज जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर दहा वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांची तात्पुरती यादी जाहीर करण्यात आली आहे. यावर पुन्हा हरकती व सूचना मागवून अंतिम यादी २४ मे रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
५ हजार २२१ बदलीपात्र शिक्षक
जिल्हा परिषद शाळांत ११ हजार ४४३ एकूण शिक्षक असून, त्यांतील १० वर्षे सेवा पूर्ण झालेले ५ हजार २२१ शिक्षक बदलीला पात्र आहेत. यात ४ हजार ८१२ शिक्षक बिगरआदिवासी व ४०९ शिक्षक आदिवासी भागातील आहेत.
समायोजनही पुन्हा करण्याची वेळ
आॅनलाईन शिक्षक संचमान्यतेनुसार तालुक्यानुसार शिक्षकांचे गेल्या आठवड्यात समायोजन करण्यात आले होते. मात्र, हे समायोजन झाल्यानंतर शासनाने पटसंख्येऐवजी शाळाखोल्याच्या संख्येवर शिक्षक निर्धारित अशी दुरुस्ती केली; त्यामुळे जिल्ह्यात ६७ शिक्षक वाढले आहेत. यामुळे शिक्षक अतिरिक्त झाल्याने त्याला दुसरी शाळा देण्यात आली. आता त्याच शाळेत शिक्षक जागा रिक्त झाल्याचे काही शाळांत प्रकार झाले आहेत. त्यामुळे हे समायोजन पुन्हा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. तालुकास्तरावर या अडचणी पहिल्यांदा सोडवाव्यात, असे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
ही प्रक्रिया निकोप व पारदर्शक व्हावी, हीच आमची अपेक्षा आहे. कोणालाही आक्षेप घेण्यास वाव राहता कामा नये. त्यात शासनानेही ५ जूनपर्यंत तालुकास्तरावरील बदल्यानां मुदतवाढ दिल्याने आम्ही मुदतवाढ देत आहोत.
-शुक्राचार्य वांजळे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद
अध्यक्ष-उपाध्यक्षांचा पारदर्शक बदल्या व्हाव्यात, हा आग्रह आहे; पण शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शिक्षक धास्तावला आहे. रोस्टर पूर्ण करून रिक्त जागा तत्काळ भराव्यात.
-बाळासाहेब मारणे, अध्यक्ष, शिक्षक संघ
शिक्षक सेवाज्येष्ठता यादी ही मॅन्युअल पद्धतीने केली जाते. यासाठी कोणतीही संगणकप्रणाली नाही. त्यामुळे यादीत काही चुका होत आहेत.
- मुश्ताक शेख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)