नालासोपाऱ्यात राम मंदिर संकल्प यात्रा उत्साहात संपन्न
By admin | Published: April 7, 2017 03:05 AM2017-04-07T03:05:45+5:302017-04-07T03:05:45+5:30
अयोध्येत राम मंदिर बांधले जावे, हा हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न बनला आहे.
वसई : अयोध्येत राम मंदिर बांधले जावे, हा हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे आता कोणावरही विसंबून न राहता हिंदूंनी संघटीत होऊन राम मंदिर बांधण्यासाठी आणि भारत भूमीत हिंदु राष्ट्र आणण्यासाठी संकल्प करावा, असे आवाहन नालासोपारा येथे श्रीराम मंदिर संकल्प यात्रेच्या निमित्ताने करण्यात आले.
हिंदू गोवंश रक्षा समिती, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग सेवा दल, योग वेदांत समिती, हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था यांनी काढलेल्या श्रीराम मंदिर संकल्प यात्रेत भाजपा, शिवसेना आणि मनसेचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. जैन साधू सिद्धार्थ मुनी, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजन नाईक, मनोज बारोट, परेश भावशी, सुरेंद्र मिश्रा, नेहा दुबे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सोपारा गावातील श्री चक्रेश्वर महादेव मंदिराजवळ प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेची आणि धर्मध्वजाची विधीवत पूजा करून संकल्प यात्रा सुरु करण्यात आली. फुलांनी सजवलेल्या रथामध्ये प्रभू रामचंद्रांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. यात्रा मार्गातील पाच किलोमीटरचा परिसर भगवे ध्वज लावून भगवामय करण्यात आला होता. मंदिर तो बनाएंगे, रामराज्य भी लायेंगे, जय श्रीराम अशा घोषणा दिल्या गेल्या. यात्रा मार्गात अनेक ठिकाणी रामचंद्रांच्या प्रतिमेचे आणि धर्मध्वजाचे औक्षण करण्यात आले. हिंदुओंका एक ही नारा, अयोध्यामें ह राम मंदिर हमारा, शपथ रामकी खाते है मंदिर वही बनाएंगे या आशयाचे फलक यात्रेत लावण्यात आले होते. सेंट्रला पार्क मैदानात यात्रेचा समारोप करण्यात आला. ज्या पवित्र स्थळावर प्रभू रामचंद्रांनी जन्म घेतला, दुर्दैवाने त्यांना दहा बाय दहाच्या तंबूत पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात दिवस कंठावे लागत आहेत. राम मंदिर बांधण्यासाठी पुरावे द्यावे लागत आहेत. राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे आणि हिंदूंच्या अतिसहिष्णूतेमुळे हिंदूंनाच मंदिर बांधण्यासाठी आंदोलने करावी लागत आहेत, असा आरोप आयोजक वैभव राऊत यांनी यावेळी केला. यावेळी यात्रेत सहभागी झालेल्यांनी अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी आणि भारतभूमीत हिंदू राष्ट्र स्थापन करण्यासाठी कटीबद्ध राहण्याची शपथ घेतली. (वार्ताहर)