वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांंना धीर द्या - बागडे
By admin | Published: January 31, 2016 01:40 AM2016-01-31T01:40:14+5:302016-01-31T01:40:14+5:30
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची ताकद वारकरी संप्रदायात आहे; भजन-कीर्तनात आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांंना धीर देऊन त्यांना सकारात्मक
औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची ताकद वारकरी संप्रदायात आहे; भजन-कीर्तनात आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांंना धीर देऊन त्यांना सकारात्मक दृष्टिकोन दिला पाहिजे, असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शनिवारी केले.
वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने गेल्या १८ जानेवारीपासून मराठवाड्यात काढण्यात आलेल्या ज्ञानोबा- तुकोबा आधार दिंडीचा शनिवारी औरंगाबादेत हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते समारोप झाला. यानिमित्त क्रांतीचौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वारकरी दिंडी काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीस शेतकरी आत्महत्यांसंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले.
बागडे म्हणाले, मोठा आर्थिक भार आणि न परवडणारी शेती हे प्रमुख कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे आहे. निराश न होता मार्ग काढा, कष्टाशिवाय पर्याय नाही, श्रमाला प्रतिष्ठा आहे, हे या आधार दिंडीतून सांगण्याचे आवाहन बागडे यांनी यावेळी केले. संपूर्ण कर्ज माफी का होत नाही, याचाही ऊहापोह त्यांनी केला.
हभप तनपुरे बाबा यांनी सांगितले की, या देशात मोठमोठाली देवस्थाने आहेत, पण एकाही देवस्थानाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेतला नाही. पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिर ट्रस्टने मात्र १०० कोटी रुपये दिले. आत्महत्या केल्यानंतर पैसे वाटण्यापेक्षा आत्महत्या होणारच नाहीत, याची काळजी घेण्याची गरज आहे. असे पैसे वाटणाऱ्यांभोवती मात्र माध्यमांचा गराडा असतो, असे हभप शिवलीकर तात्या म्हणाले. यावेळी श्रीकांत महाराजांनी शपथेचे वाचन केले. (प्रतिनिधी)