खासगी कंपन्यांसाठी आरेची ‘एनर्जी’ गायब

By admin | Published: March 29, 2017 04:04 AM2017-03-29T04:04:52+5:302017-03-29T04:17:06+5:30

शासकीय असून देखील प्रचंड मागणी असलेले आरे डेअरीचे ‘एनर्जी’हे सुगंधित दूध मुंबईतून गायब झाले असून आरेच्या वितरण

'Energy' disappears for private companies | खासगी कंपन्यांसाठी आरेची ‘एनर्जी’ गायब

खासगी कंपन्यांसाठी आरेची ‘एनर्जी’ गायब

Next

नंदकिशोर पाटील / मुंबई
शासकीय असून देखील प्रचंड मागणी असलेले आरे डेअरीचे ‘एनर्जी’हे सुगंधित दूध मुंबईतून गायब झाले असून आरेच्या वितरण केंद्रांवर दूध सोडून इतर उत्पादनांचीच राजरोसपणे विक्री होत आहे. दुग्धविकास खात्यात बसलेल्या झारीतील शुक्राचार्यांनी खासगी दूध कंपन्यांशी संगनमत करून हा लोकप्रिय ब्रॅण्ड नामशेष केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत आरे डेअरीच्या ‘एनर्जी’ दुधाला प्रचंड मागणी होती. विशेषत: हॉस्पिटल्स्, शाळा-महाविद्यालये, खासगी कंपन्यांची कार्यालये आणि मंत्रालयात या दुधाची मोठ्याप्रमाणात मागणी होती. डॉक्टर्ससुध्दा हे दूध पिण्याची शिफारस करत असत. प्रतवारीत हे दूध इतर खासगी दूध कंपन्यांच्या उत्पादनाहून सरस होते. आरेच्या ‘एनर्र्जीं’ची वाढती मागणी लक्षात घेऊन गुजरातेतील ‘अमूल’ आणि इतर काही कंपन्यांनी तशाच प्रकारचे दूध मुंबईत आणले, परंतु ग्राहकांची पसंती एनर्जीलाच होती. असे असताना हे दूध अचानक आरेच्या स्टॉल्सवरून गायब झाले आहे.
वरळीतील आरेची डेअरी बंद पडल्यानंतर सरकारने निविदा काढून ‘एनर्जी’चे उत्पादन खासगी कंपन्यांकडून करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार कुतवळ फूड प्रॉडक्टने १ कोटी ३८ लाख रुपयांची रॉयल्टी भरून एनर्जीचे उत्पादन सुरू केले. परंतु अचानक ते थांबविण्यात आले. त्यानंतर ‘एनर्जी’सदृष्य अनेक खासगी ब्रॅण्ड्सची आरेच्या स्टॉल्सवरून राजरोसपणे विक्री सुरू झाली. ग्राहकांनी ‘एनर्जी’ची मागणी केली, तर खासगी कंपनीच्या दुधाची बॉटल दिली जाते.
मुंबईत मोक्यांच्या जागी आरेचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्यावर फक्त आरे आणि महानंदाचे प्रॉडक्टस् विकण्याचे बंधन असताना बहुराष्ट्रीय कंपन्यांची शीतपेये, खासगी कंपन्याचे दूध व दुग्धजन्य पदार्थ आणि इतर खाद्य पदार्थ ठेवले जातात. त्यासाठी स्टॉलधारकांकडून वेगळा ‘कर’ वसूल केला जातो. ही रक्कम कोणाच्या खात्यात जाते, याची चौकशी होण्याची गरज आहे.
परराज्यातून आलेल्या ‘अमूल’ला महाराष्ट्रात दूध संकलित करण्याची परवानगी दिली जाते; मात्र महानंदा आणि आरेसारखे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी प्रकल्प बंद ठेवले जात आहेत, याबद्दल शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू ,प्रकाश आबीटकर आदींनी विधानसभेत सरकारला जाब विचारला. अमूलप्रमाणे विविध दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करून महानंदा आणि आरेला संजीवनी द्यावी, तसेच वरळीतील आरे डेअरीचे आधुनिकरण करून बंद पडलेला हा प्रकल्प पुनरूज्जीवित करावा, अशीही मागणी या आमदारांनी केली. त्यावर उत्तर देताना दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी महानंदा आणि आरेचे पुनरुज्जीवन करण्याचे आश्वासन दिले.


एनर्जीला खूप मागणी होती, हे खरे आहे. पण सध्या दुधाची कमतरता आहे. आरेचे ‘एनर्जी’ बंद असले तरी ‘शक्ती’ आणि ‘पंचवटी’ हे ब्रॅण्ड सुरू आहेत. एनर्जीसाठी नव्याने निविदा काढण्यात आली आहे. लवकरच हा ब्रॅण्ड पुन्हा बाजारात येईल.
- आर.जी. कुलकर्णी
महाव्यवस्थापक,
दुग्धविकास


मुंबईत आरेचे १८०० दूधविक्री केंद्र असून त्यावर दररोज ‘एनर्जी’च्या ४८ हजार बॉटल्सची विक्री होत असे.

Web Title: 'Energy' disappears for private companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.