अनिल देशमुखांचा पाय खोलात; पीए संजीव पलांडे, कुंदन शिंदेंना ईडीकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 07:19 AM2021-06-26T07:19:41+5:302021-06-26T07:36:29+5:30
ईडीकडून काल अनिल देशमुखांची नऊ तास चौकशी; मध्यरात्रीच्या सुमारास दोन पीएंना अटक
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. देशमुख यांच्यावर झालेल्या वसुलींच्या आरोपांप्रकरणी काल सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) त्यांची जवळपास ९ तास चौकशी केली. त्यांचे पीए संजीव पलांडे यांनादेखील ईडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं. ईडीनं काल मध्यरात्री पीए संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक केली. काल दिवसभरात ईडीनं देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. यात त्यांचं नागपूर, मुंबईतील निवासस्थान आणि नागपूरमधील त्यांच्या भागिदारांच्या मालमत्तांचा समावेश आहे. (Enforcement Directorate Arrested Anil Deshmukh Secretaries Sanjeev Palande And Kundan Shinde)
अनिल देशमुख आणि काही इतर व्यक्तींच्या विरोधात ईडीनं गेल्याच महिन्यात मनी लाँड्रिंग कायद्याच्या अंतर्गत एक गुन्हा दाखल केला होता. सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून एका गुन्ह्याची नोंद करत सुरुवातीचा तपास केला होता. त्यानंतर ईडीनं गुन्हा नोंदवला. मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझेंना देशमुख यांनी हॉटेल, बार मालकांकडून १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता.
देशमुखांवरील कारवाई न्यायलयाच्या निर्देशानेच; राऊत राष्ट्रवादीची सुपारी वाजवत असतात; फडणवीसांचा टोला
अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांच्या अटकेनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी एक ट्विट केलं. 'वसूली प्रकरणात अनिल देशमुख यांचे सचिव संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडीनं अटक केली आहे. पुढील काही दिवसांत अनिल देशमुखांनादेखील अटक होईल, असा मला विश्वास वाटतो,' असं सोमय्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
जेव्हा पोलीस आयुक्त पदावर होते, तेव्हा त्यांनी माझ्यावर आरोप का नाही केले; अनिल देशमुखांनी केला सवाल
मी ईडीच्या अधिकाऱ्यांना संपूर्णपणे सहकार्य करत आहे. सत्य समोर येईलच अशी आशा आहे. भविष्यातही मी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करेन, असं ईडीच्या छापेमारीनंतर अनिल देशमुख म्हणाले. काल सकाळच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानावर छापा टाकला. तीन तास त्यांनी घराची झडती घेतली. या कारवाईची कल्पना नागपूर पोलिसांना नव्हती. ईडीच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवान उपस्थित होते.