अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीच्या धर्मांतराचा प्रयत्न
By admin | Published: September 13, 2014 03:02 AM2014-09-13T03:02:54+5:302014-09-13T12:31:29+5:30
बुलडाणा पोलीस स्टेशनमध्ये गुरूवारी दाखल झालेल्या तक्रारीनुसार, इंदिरानगर भागातील मोहसीन शेख हा संगम चौकातील एका मोबाईल फोनच्या दुकानात कामाला आहे
बुलडाणा : लव्ह जिहादच्या मुद्यावर देशभरात वादळ सुरू असताना, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीचे अपहरण करून तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, बुलडाणा पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
बुलडाणा पोलीस स्टेशनमध्ये गुरूवारी दाखल झालेल्या तक्रारीनुसार, इंदिरानगर भागातील मोहसीन शेख हा संगम चौकातील एका मोबाईल फोनच्या दुकानात कामाला आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाची एक विद्यार्थिनी या दुकानावर तिचा मोबाईल फोन रिचार्ज करण्यासाठी जायची. त्यामुळे मोहसीनला तिचा मोबाईल फोन नंबर सहजच मिळाला. त्यानंतर त्याने तिच्याशी संपर्क साधून, मैत्री केली. कालांतराने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. हा प्रकार जून महिन्याच्या अखेरीस घडला होता. दरम्यान, २८ जून रोजी विद्यार्थिनीच्या वडिलांनी बुलडाणा पोलिसांकडे मुलीला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली होती; परंतु, तत्पूर्वी मोहसिनने विद्यार्थिनीला भिवंडी येथे बहिणीच्या घरी नेले होते. तिथे आपले धर्मांतर करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला असल्याचा आरोप युवतीने केला आहे.
आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस या विद्यार्थिनीने मुंबईतील भिवंडी येथील एका पोलीस कॉन्स्टेबलची भेट घेऊन त्याला आपबिती कथन केली. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांने २५ आॅगस्टला तिला बुलडाणा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर ११ सप्टेंबरला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये मोहसीन शेख, आई मेहरूनिस्सा शेख, सलीम खान, शाहिस्ता शेख यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)