अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया : आतापर्यंत ३५ टक्के जागांवरच प्रवेश
By admin | Published: July 26, 2016 09:18 PM2016-07-26T21:18:29+5:302016-07-26T21:26:22+5:30
अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या तीन प्रवेश फेऱ्या संपल्या असून यात महाविद्यालयांसाठी फारसे आशादायक चित्र समोर आलेले नाही.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २६ : अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या तीन प्रवेश फेऱ्या संपल्या असून यात महाविद्यालयांसाठी फारसे आशादायक चित्र समोर आलेले नाही. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत ३५ टक्के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेशनिश्चिती केली आहे. बदललेल्या नियमांनुसार चौथ्या प्रवेशफेरीसाठी विद्यार्थ्यांना नवीन आॅप्शन फॉर्म भरता येणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांच्या आशा या फेरीवर टिकून आहेत.
नागपूर विभागातील ५८ अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या एकूण २५,२९२ जागा आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नव्या नियमांनुसार यंदा विद्यार्थ्यांना आवडत्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे. याअगोदर सीईटीत चांगले गुण मिळाल्यानंतरदेखील विद्यार्थ्यांना आवडते महाविद्यालय किंवा शाखा मिळत नव्हती. पहिल्या फेरीत जे महाविद्यालय मिळाले आहे, तेथेच प्रवेश घ्यावा लागत होता.
कॅपच्या पहिल्या फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी १०० महाविद्यालयांचे विकल्प दिले होते. तिसऱ्या फेरीपर्यंत आवडते महाविद्यालय मिळाले नाही तर चौथ्या फेरीत त्यांना महाविद्यालयांचे विकल्प बदलण्याची संधी आहे. प्रक्रियेदरम्यान जागेसंदर्भातील आपली भुमिका विद्यार्थ्यांना फ्रीझ, स्लाईड, फ्लोट या विकल्पांतून सांगायची होती.
त्यानुसार तिसऱ्या फेरीअखेर ८ हजार ९४५ विद्यार्थ्यांनी फ्रीझचा विकल्प निवडून आपली जागा निश्चित केली आहे. हे विद्यार्थी पुढील फेऱ्यांसाठी पात्र राहणार नाहीत. परंतु अनेक विद्यार्थ्यांनी आवडते महाविद्यालय व शाखा मिळेल या अपेक्षेत स्लाईड व फ्लोट या विकल्पांची निवड केली. त्यांनी प्रवेशासाठी फ्रीझ विकल्प न घेतल्यामुळे त्यांची प्रवेशनिश्चिती झाली नाही. त्यामुळे या उमेदवारांना आता चौथ्या फेरीत नव्याने महाविद्यालयांचा विकल्प क्रम द्यायचा आहे.