ट्रॅव्हल्स एजन्सीकडून अभियंत्याची फसवणूक
By admin | Published: August 11, 2014 12:49 AM2014-08-11T00:49:05+5:302014-08-11T00:49:05+5:30
स्पेन आणि पोर्तुगाल या देशात फिरायला जात असलेल्या एका अभियंत्याची ट्रॅव्हल्स एजन्सीतर्फे फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. विदेशात फिरायला जाण्यासाठी विमान
पोलिसांचा तपास सुरू : व्हिसा जारी झाल्यावर रद्द केले विमानाचे तिकीट
नागपूर : स्पेन आणि पोर्तुगाल या देशात फिरायला जात असलेल्या एका अभियंत्याची ट्रॅव्हल्स एजन्सीतर्फे फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. विदेशात फिरायला जाण्यासाठी विमान आणि रेल्वेचे तिकीट बुक केल्यानंतरही ते फिरायला जाऊ शकले नाही. तर त्यांचे मित्र, पत्नी आणि मुलाला ट्रॅव्हल्स एजन्सीच्या बेजबाबदारपणामुळे व्हिसा मिळाल्यानंतरही विमानाचे तिकीट रद्द झाल्याने लाखोंचा चुना लागला.
वंजारीनगर येथील शासकीय कंत्राटदार सचिन काकडे यांनी त्यांचे मित्र व त्यांच्या कुटुंबीयांसह स्पेन आणि पोर्तुगाल या देशात फिरायला जाण्याची योजना आखली होती. काकडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी अमरावती मार्गावरील बोले पेट्रोल पंपाजवळील कॉक्स अॅण्ड किंग्स या ट्रॅव्हल्स एजन्सीकडून टूर पॅकेज घेतले. आठ लाख रुपयांचा एकूण टूर पॅकेज होता. त्यापैकी तीन लाख रुपये त्यांनी १४ एप्रिल रोजी दिले. ट्रॅव्हल्स एजन्सीतर्फे सात दिवसात व्हिसा आणि इतर आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु १५ दिवस लोटूनही व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे काकडे यांनी ट्रॅव्हल्स एजन्सीशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी निश्चिंत राहा व्हिसा अवश्य मिळेल, असे आश्वासन दिले. त्यानंतर काकडे यांनी १ मे रोजी १ लाख ३० हजार रुपये आणि १५ मे रोजी पुन्हा एक लाख रुपये भरले. दोन्ही वेळेला व्हिसाबाबत माहिती विचारली असता काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. ट्रॅव्हल्स एजन्सीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून काकडे यांनी उर्वरित रक्कमही १९ मे रोजी दिली.
काकडे व त्यांच्या मित्रांना २४ मे रोजी स्पेन व पोर्तुगालला रवाना व्हायचे होते. जाण्याची तारीख जवळ येऊ लागली तरी व्हिसा न मिळाल्याने ते चिंतेत पडले. पुन्हा विचारणा केली, तेव्हा काम सुरू असल्याचे एकच उत्तर मिळाले.
विदेशात जाण्याच्या एक दिवसापूर्वी २३ मे रोजी ट्रॅव्हल्स एजन्सीमधून श्रद्धा राऊत या महिला कर्मचाऱ्यांचा काकडे यांना फोन आला. त्यांनी सांगितले की, व्हिसा जारी न झाल्याने तुमचा प्रवास रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. काकडे यांना धक्काच बसला. कारण तेव्हापर्यंत विमान, रेल्वे आणि हॉटेलच्या बुकिंगवर आठ लाख रुपये खर्च झाले होते. व्हिसा जारी का झाला नाही, याचे कारण विचारले असता त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हते.
काकडे यांच्या मित्राचा मुलगा व्हीएनआयटीचा विद्यार्थी आहे. बोर्डाच्या परीक्षेत राज्यातून पहिला आला होता. त्यामुळे त्याला पुढील उच्च शिक्षणासाठी विदेशात जायचे होते. व्हिसा जारी न झाल्याने काकडे आणि त्यांच्या मित्राने कारण जाणून घेण्यासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कॉक्स अॅण्ड किंग्स ट्रॅव्हल्स एजन्सीने काकडे यांना दोन चार दिवसात व्हिसा जारी होईल, असा विश्वास देत प्रवास पुढे ढकलण्याची विनंती केली. त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवून त्यांनी विमान, रेल्वे आणि हॉटेलचे बुकिंग रद्द केले. त्यांनी नव्याने तीन दिवसांनंतरचे बुकिंग केले. या मोबदल्यात ट्रॅव्हल्स एजन्सीने दोन लाख रुपयांची मागणी केली. काकडे यांनी संतापून पोलिसात तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला. तेव्हा टॅव्हल्स एजन्सीवाले १ लाख २० हजार रुपये स्वत: देण्यास तयार झाले. नव्याने कागदपत्र सादर करून काकडे आणि त्यांचे मित्र स्पेनच्या दुतावासात गेले असता तिथे काकडे यांचा व्हिसा दस्ताऐवज नसल्याने रद्द करण्यात आला असून इतर तिघांचाही व्हिसा २२ मे रोजीच जारी झाल्याची माहिती मिळाली. याबाबत त्यांनी ट्रॅव्हल्स एजन्सीला जाब विचारला असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.
काकडे यांना वगळून त्यांचे मित्र पत्नी व मुलासह स्पेनला रवाना झाले. परंतु ठरल्यानुसार त्यांची योग्य सोय करण्यात आली नाही. त्यांना स्टेशनपासून खूप दूर असलेल्या हॉटेलात थांबविण्यात आले होते. अनेक त्रास सहन करून काकडे यांचे मित्र नागपूरला परतले. त्यानंतर ते दोघेही ट्रॅव्हल्स एजन्सीच्या कार्यालयात जाऊन याबाबत जाब विचारला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांनी गुन्हे शाखा पोलिसात तक्रार दाखल केली. याबाबत ट्रॅव्हल्स एजन्सीचे स्थानिक प्रतिनिधी प्रवीण देवतळे यांना या प्रकरणाबाबत विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला.
तसेच याबाबत कंपनीच्या मुंबई मुख्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. यावर अधिक काहीही न बोलता मुंबईतील अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यास सांगितले.