अभियांत्रिकीची बाके यंदाही रिकामीच; फार्मसी, आर्किटेक्चरला विद्यार्थ्यांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 03:47 AM2018-09-02T03:47:26+5:302018-09-02T03:47:37+5:30
राज्यातील अभियांत्रिकी शिक्षणाचा घसरलेला दर्जा तसेच काही विशिष्ट शाखांमध्ये नोकऱ्यांची संधी कमी झाल्याने अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळण्याचे प्रमाण यंदाही कमीच आहे. यंदा अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेत अखेर राज्यात तब्ब्ल ४३ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत.
- सीमा महांगडे
मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी शिक्षणाचा घसरलेला दर्जा तसेच काही विशिष्ट शाखांमध्ये नोकऱ्यांची संधी कमी झाल्याने अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळण्याचे प्रमाण यंदाही कमीच आहे. यंदा अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेत अखेर राज्यात तब्ब्ल ४३ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. याउलट फार्मसी आणि आर्किटेक्चर या विषयांकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक आहे.
एमबीएच्या अभयसक्रमालाही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उत्तम आहे. तर एमसीएकडे अद्याप विद्यार्थ्यांचा ओढा एवढा जास्त नसल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
३१ आॅगस्टला २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील व्यावसायिक अभ्याक्रमांच्या प्रवेशाचा कट आॅफ जाहीर होणार होता. त्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक अभ्याक्रमाच्या रिक्त जागांची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाकडून मिळाली आहे. यंदा अभियांत्रिकीच्या राज्यात तब्ब्ल १,३०,००० जागा उपलब्ध होत्या. त्यातील ७३,९५० जागांवर ३१ तारखेपर्यंत प्रवेश निश्चित झाले असून तब्बल ५६,००० जागा रिक्त राहिल्या आहेत. यासाठी १ लाख ६ हजार अर्ज भरले होते.
मागील वर्षी १,३८,२२६ जागांसाठी केवळ ८१,७३६ विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या पदवी प्रथम वर्षाला प्रवेश घेतले होते. तब्बल ५६,४९० जागा रिक्त राहिल्या होत्या. जागा रिक्त राहण्याचे प्रमाण जवळपास ४० टक्के इतके होते. गेल्या काही वर्षांपासून एकीकडे अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील रिक्त जागांचे प्रमाण हे सातत्याने वाढत चालले आहे
तर दुसरीकडे अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जाही खालावत चालल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल हा अभियांत्रिकी शिक्षणाऐवजी अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे वाढत चालला
आहे.
ग्रामीण भागातील अनेक महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकीच्या काही अभ्यासक्रमांना विद्यार्थीच मिळत नसल्याने अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहात असल्याची शक्यता असल्याचे डीटीईमधील एका वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले. दुसरीकडे राज्यात या वर्षी फार्मसीच्या फक्त २१७ जागा तर आर्किटेक्चरच्या ४७७ जागाच रिक्त राहिल्या आहेत.
यंदा फार्मसी आणि आर्किटेक्चर या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्त आहे. तसेच नवीन महाविद्यालये किंवा तुकड्यांना मान्यता न मिळाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अभियांत्रिकीमधील जागा रिक्त राहण्याच्या प्रमाणात फारसा फरक पडलेला नाही.
- अभय वाघ , संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय
शाखा क्षमता प्रवेश रिक्त जागा
एमबीए ३४,४०७ २९,४०४ ५००३
प्रथम वर्ष १,३०,००० ७३,९५० ५६,०५०
अभियांत्रिकी
फार्मासी १७,००० १६,७८३ २१७
आर्किटेक्चर ५२७७ ४८०० ४७७
एमसीए ८२३० ४१९२ ४०३८