अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनाही ‘काम’ देणार
By admin | Published: April 2, 2017 03:02 AM2017-04-02T03:02:38+5:302017-04-02T03:02:38+5:30
तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनात त्या ज्ञानाचा वापर करता येत नाही. यावर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांप्रमाणे
पुणे : तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनात त्या ज्ञानाचा वापर करता येत नाही. यावर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनाही ग्रामीण भागात जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकासविषयक कामे देण्याबाबत विचार सुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.
मनुष्यबळ विकास मंत्रालयासह विविध संस्थांच्या सहकार्याने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’मध्ये पुण्यासह देशभरातील २६ केंद्रांतील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांशी पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्ली येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. पुण्यात कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या आवारात या स्पर्धेचे केंद्र आहे. या ठिकाणी मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. या संवादादरम्यान एका विद्यार्थिनीने वैद्यकीय विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात जाऊन काम करणे बंधनकारक असून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनाही अशी संधी मिळाल्यास ग्रामीण भागाचा विकास होईल, असे मोदी यांना सुचविले. यावर मोदी यांनी गुजरातमध्ये असा प्रयोग यापूर्वीच केला असल्याचे सांगितले. तिथे सुटीच्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विविध समस्या सोडविण्याची कामे त्यांना देण्यात आली होती. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. केंद्र स्तरावरही हा विचार सुरू आहे, असे मोदी यांनी या वेळी स्पष्ट केले.
त्यापूर्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले, ‘‘तंत्रज्ञानाचा झपाट्याने वापर वाढत असून आपले जीवनमानही त्यानुसार बदलत आहे. दैनंदिन जीवनातील लोकांच्या गरजा भागविणे, जीवनमान उंचावणे तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. सर्व समस्या सरकारच सोडवेल, हा भ्रम असून लोकसहभागाशिवाय ते शक्य होणार नाही. यामध्ये तरुणांचा सहभाग महत्त्वाचा आहे.’’ आजच्या तरुणाईमध्ये खूप क्षमता असून, नवनवीन कल्पनांचा ध्यास ती घेते. या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी संकल्प करून त्यासाठी अपार कष्ट करायला हवेत. त्यामध्ये गुणवत्तेशी तडजोड करता कामा नये, असा सल्ला मोदी यांनी दिला.
दरम्यान, हॅकेथॉनमध्ये देशातील विविध अभियांत्रिकी, आयआयटी, एनआयटी तसेच इतर संशोधन संस्थांमधील १,२६६ संघांमध्ये १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. दि. १ व २ एप्रिल असे दोन दिवस देशातील २६ शहरांमध्ये एकाच वेळी हॅकेथॉनची अंतिम फेरी होत आहे.
राज्यात पुण्यासह मुंबई
आणि नागपूर या केंद्रांचा त्यामध्ये समावेश आहे. एकूण २९ मंत्रालये व विभागांशी संबंधित विविध
समस्या, अडचणींवर उपाययोजना शोधण्यासाठी या अभिनव हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. चांगल्या उपाययोजना, कल्पना सुचविणाऱ्या संघांना पारितोषिके दिली जाणार आहेत. दि. २ एप्रिल रोजी रात्री या स्पर्धेचे निकाल जाहीर केले जातील.
(प्रतिनिधी)