अभियंत्यांची झाडाझडती

By Admin | Published: June 10, 2016 02:42 AM2016-06-10T02:42:25+5:302016-06-10T02:42:25+5:30

महापालिका आयुक्त तुकाराम मुंंढे यांनी बुधवारी अभियांत्रिकी विभागाची सलग आठ तास मॅरेथॉन बैठक घेतली.

Engineers Plant | अभियंत्यांची झाडाझडती

अभियंत्यांची झाडाझडती

googlenewsNext

नामदेव मोरे,

नवी मुंबई- महापालिका आयुक्त तुकाराम मुंंढे यांनी बुधवारी अभियांत्रिकी विभागाची सलग आठ तास मॅरेथॉन बैठक घेतली. शहरातील रखडलेल्या विकास कामांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे कोणत्याही कामाला विनाकारण मुदतवाढ दिली जाणार नाही. कामे वेळेत व दर्जेदारच झाली पाहिजेत असे स्पष्ट आदेश देवून निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमधील एकाही मोठ्या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण झालेले नाही. प्रत्येक ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ दिली जाते. धीम्यागतीने कामे होत असल्याने वाढीव खर्चाचा भार तिजोरीवर पडू लागला आहे. ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, नेरूळ, बेलापूर, ऐरोलीमधील रूग्णालये, वाशीतील तरणतलाव, पामबीच रोडवरील सुशोभीकरण, एमआयडीसीतील काँक्रीटीकरणाची कामे अत्यंत धीम्या गतीने सुरू आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच प्रत्येक काम वेळेतच झाले पाहिजे असे स्पष्ट आदेश दिले होते. बुधवारी अभियांत्रिकी विभागाची विशेष बैठक आयोजित केली होती. सकाळी दहा वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होती. यामध्ये सर्व प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. काम कधी सुरू झाले, सद्यस्थिती काय आहे. कामे वेळेत का पूर्ण झाली नाहीत. वारंवार मुदतवाढ का देण्यात येत आहे अशी प्रश्नांची सरबत्ती अधिकाऱ्यांना केली. जनतेच्या पैशाचा योग्य वापर झाला पाहिजे. कामे रखडल्याने कामांच्या किमती वाढत असल्याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली. निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ कारणेदाखवा नोटीस बजावली आहे.
आयुक्तांनी अत्यंत कडक शब्दात अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आयुक्तांनी बरोबर चुकांवर बोट ठेवल्याने उत्तर देताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.
आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागाला फैलावर घेवून यापुढे कोणत्याही स्थितीमध्ये कामामध्ये दिरंगाई चालणार नाही. दिलेल्या मुदतीमध्येच कामे पूर्ण झाली पाहिजेत. मुदतवाढ द्यायची असेल तर त्यासाठी सक्षम कारण असले पाहिजे. ठेकेदार निष्काळजीपणा करत असेल तर त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल. कामांसाठी सद्यस्थितीतील डीसीआरचा अवलंब करण्यात यावा. टेंडर देताना त्यांची प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी व्यवस्थित पाहून घेणे. प्रत्येक कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या विभागातच बसले पाहिजे. शहर अभियंत्यांनी प्रत्येक आठवड्याला आढावा बैठक घेण्यात यावी असे स्पष्ट केले. आयुक्त स्वत: प्रत्येक महिन्याला कामाचा आढावा घेणार आहेत. आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेमुळे प्रशासनाचे व ठेकेदारांचेही धाबे दणाणले आहे. अधिकाऱ्यांनी तत्काळ सर्व ठेकेदारांना कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापुढे विकासकामे करताना कामाची खरोखर गरज आहे का याची पाहणी करणे. जिथे काम करायचे तेथील छायाचित्र घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
>पहिल्यांदा आठ तास बैठक
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सकाळी दहा वाजता अभियांत्रिकी विभागाची बैठक सुरू केली. सायंकाळी सहापर्यंत सर्व विभागातील अभियंते व त्यांच्याकडील सुरू असलेली कामे, रखडलेली कामे यांचा तपशीलवार आढावा घेतला. रखडलेल्या कामांविषयी तीव्र नाराजी व्यक्त करून ती वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले.
>८३ कोटींचा खर्च
१७० कोटींवर
तीन रूग्णालयांचे काम २००९ मध्ये सुरू केले. यासाठी ८३ कोटींचा ठेका देण्यात आला होता. परंतु काम रखडल्याने २०१५ पर्यंत या कामासाठी १७० कोटींचा खर्च केला. वैद्यकीय साहित्य, फर्निचर व इतर कामांसाठी केलेला खर्च विचारात घेतल्यानंतर हा खर्च २०० कोटी रूपयांपेक्षा जास्त झाला असून या जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई कोण व कधी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Engineers Plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.