अभियंत्यांचे आंदोलन स्थगित
By admin | Published: October 8, 2016 05:59 AM2016-10-08T05:59:30+5:302016-10-08T05:59:30+5:30
महापालिकेतील चार हजार अभियंत्यांनी सुरू केलेले आंदोलन पालिका प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले
मुंबई : रस्ते विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या मानहानीच्या निषेधार्थ मुंबई महापालिकेतील चार हजार अभियंत्यांनी सुरू केलेले आंदोलन पालिका प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे. मात्र पुढच्या गुरुवारपर्यंत मनसे नगरसेवकांवर कारवाई न झाल्यास आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असा इशारा अभियंता संयुक्त कृती समितीने आज दिला.
मनसेचे गटनेते संदीप देशपांडे व नगरसेवक संतोष धुरी यांनी मुख्य अभियंता संजय दराडे यांना बुधवारी खड्ड्यात उभे करून खड्ड्यांना मी जबाबदार असल्याचा फलक हातात दिला होता. यामुळे संतप्त पालिका अभियंत्यांनी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला. परिणामी अत्यावश्यक सेवाही ठप्प होण्याची शक्यता होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी मनसे गटनेता संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, या घटनेनंतर आक्रमक भूमिका घेणारे देशपांडे यांनी आज दिवसभर मोबाइल बंद ठेवल्याने ते कारवाई चुकवण्यासाठी गायब झाल्याची चर्चा पालिकेत रंगली होती. (प्रतिनिधी)
>आंदोलकांच्या मागण्या
मनसे गटनेते संदीप देशपांडे व धुरी यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा. कर्मचारी अधिकारी, अभियंता यांना मारहाण होत असल्याने डॉक्टरांप्रमाणे संरक्षण मिळावे, असा कायदा करावा, अभियंत्यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी अभियंत्यांनी केली आहे.