इंग्रजी भाषेने पोट भरेल, पण मन नाही
By admin | Published: March 13, 2016 02:05 AM2016-03-13T02:05:47+5:302016-03-13T02:05:47+5:30
राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाचे उद्घाटनप्रसंगी दासू वैद्य यांचे प्रतिपादन.
हर्षनंदन वाघ/बुलडाणा
मराठी भाषेचे व्यावसायिक महत्त्व सिद्ध न करता आल्यामुळे इंग्रजीचं स्तोम माजले आहे. चांगल्या दज्रेदार मराठी शाळा आपल्याला चालवता आल्या नाहीत. अशा परिस्थितीत इंग्रजी माध्यमात शिकणार्या मुलांना मराठी साहित्याकडे जाणीवपूर्वक वळवावे लागेल. इंग्रजी भाषेने पोट भरेल; पण मन भरणार नाही, असे मत राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी दासू वैद्य यांनी व्यक्त केले.
स्थानिक गर्दे वाचनालयाच्या संत चोखामेळा साहित्य परिसरात राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संमेलनाचे उद्घाटक कवी, गीतकार प्रसाद कुलकर्णी, स्वागताध्यक्ष अरुणा कुल्ली, निमंत्रक आमदार हर्षवर्धन सपकाळ व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आजचे बालकुमार, युवकांची पिढी गतिमान असून, त्यांच्यासमोर असलेली आधुनिक प्रसार माध्यमे गोंधळ निर्माण करीत आहेत. माध्यमाद्वारे काही चुकीच्या बाबी समोर येतात, असे नाही; पण अधिक विचारपूर्वक ही माध्यमे वापरण्याची वेळ आली आहे. केवळ माध्यमेच नव्हे तर समाज व कुटुंबानेही जबाबदारी घेऊन बाल कुमारांशी संवाद वाढवण्याचे काम झाले पाहिजे, त्यासाठीच अशी साहित्य संमेलने आवश्यक असल्याचे मत वैद्य यांनी मांडले.
आयुष्याचे पुस्तक वाचता आले तर तो जीवनात यशस्वी होतो. आयुष्यात मोठे व्हायचे असेल, तर विचार, संस्कृतीचे अभिसरण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रसाद कुलकर्णी यांनी केले.