नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्यात आनंद

By admin | Published: March 8, 2016 02:59 AM2016-03-08T02:59:12+5:302016-03-08T02:59:12+5:30

कोणतीही व्यक्ती परिस्थितीतून नाही, तर अनुभवातून शिकत जाते. घर सुखवस्तू असले की, वेगळे काही करण्याची जिद्द फार कमी लोकांमध्ये पाहायला मिळते

Enjoying a job rather than a job | नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्यात आनंद

नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्यात आनंद

Next

पद्मजा जांगडे, मुंबई
कोणतीही व्यक्ती परिस्थितीतून नाही, तर अनुभवातून शिकत जाते. घर सुखवस्तू असले की, वेगळे काही करण्याची जिद्द फार कमी लोकांमध्ये पाहायला मिळते. मात्र, अनिशा सोमवंशी त्याला अपवाद ठरल्या आहेत. त्यांनी प्लेसमेंट एजन्सी सुरू करून गेल्या आठ वर्षांत ४,००० जणांना नोकरी मिळवून दिली आहे.
सर्वसामान्य कुटुंबात अनिशा यांचा जन्म झाला. पुण्यात एमए अर्थशास्त्राची पदवी त्यांनी मिळवली. मात्र, शिक्षण सुरू असतानाच आपला खर्च आपणच भागवायचा, असा निश्चय त्यांनी केला. कधी शाम्पू तर कधी साबण, कधी फटाके, तर कधी परफ्युम विकण्यास सुरुवात केली. मार्केटिंग स्किल्स आपोआपच अवगत झाली. आज याच स्किल्सच्या जोरावर आज त्या एक प्लेसमेंट एजन्सी समर्थपणे चालवत आहेत. बहुतेक मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
लग्नानंतर पनवेलमध्ये स्थायिक झाल्यावर अनिशा यांनी शिक्षिका म्हणून काम केले, पण साचेबद्ध नोकरी करून त्या स्वस्थ बसू शकत नव्हत्या. अखेर २००८ मध्ये ऐन मंदीच्या काळात त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि हाच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. पूर्ण वेळ प्लेसमेंट चालवायची, मग त्यासाठी जाहिरात करणे, कंपन्यांची माहिती गोळा करणे, चर्चा करणे, यापासून ते नोकरीच्या शोधातील उमेदवार मिळवणे या सगळ्यात त्यांची कसोटी लागत होती.
त्यांच्या ‘रेडविंग’ प्लेसमेंट एजन्सीची सुरुवात रडतखडतच झाल्याचे अनिशा सांगतात. एखाद्याला नोकरी मिळाली की, तो दोघांना सांगायचा. अगदी कनिष्ठ लिपिकापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांचा त्यात समावेश आहे. काहींना परदेशात नोकरी करण्याची संधी मिळाली आहे. ३०० कंपन्यांशी रेडविंगचे टायअप असून वार्षिक उत्पन्न ५० लाखांच्या घरात आहे. नवी मुंबई, तळोजा, रसायनी, पनवेलबरोबरच खोपोली येथील औद्योगिक कंपन्यांमध्ये त्यांचे हजारो उमेदवार कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, नोकरी लागल्यावर उमेदवारांकडून रेडविंग एक पैसाही घेत नाही. ‘आमच्या एजन्सीचे टायअप थेट कंपन्यांशी असल्याने, उमेदवाराकडून शुल्क आकारले जात नाही. मात्र, नोकरी मिळाल्यानंतर उमेदवाराच्या चेहऱ्यावरील समाधान, हातावर ठेवला जाणारा पेढा, काम जोमाने करण्याची ऊर्जा देतो,’ असे अनिशा सांगतात.

Web Title: Enjoying a job rather than a job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.