‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिक येणार नव्या स्वरुपात - आंबेडकर
By Admin | Published: April 12, 2017 01:40 AM2017-04-12T01:40:00+5:302017-04-12T01:40:00+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली लढाई आणि उपस्थित केलेले प्रश्न आजही नव्या स्वरुपात तसेच आहेत. एकीकडे रस्त्यावरची लढाई सुरू ठेवतानाच वैचारिक प्रबोधन झाले
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली लढाई आणि उपस्थित केलेले प्रश्न आजही नव्या स्वरुपात तसेच आहेत. एकीकडे रस्त्यावरची लढाई सुरू ठेवतानाच वैचारिक प्रबोधन झाले पाहिजे, या हेतूने बाबासाहेबांनी सुरू केलेले ‘प्रबुद्ध भारत’ हे पाक्षिक पुन्हा नव्या स्वरुपात सुरू करण्यात येत आहे, अशी घोषणा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
महात्मा फुले यांच्या जयंतीचे निमित्त साधून त्यांनी ही घोषणा केली. या वेळी प्रा. प्रतिमा परदेशी, प्रा. अंजली मायदेव, किशोर ढमाले, विलास टेकाळे, संदीप तायडे आदी उपस्थित होते. यावेळी आंबेडकर म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता ही नियतकालिके त्यांच्या संघर्षाच्या विविध टप्प्यांवर सुरू केली. ‘जनता’चे प्रबुद्ध भारतमध्ये परिवर्तन करताना, त्यांनी देशातील नागरिक हे प्रबुद्ध व्हावेत, म्हणजेच लोकशाही मानणारे, व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करणारे, सामाजिक न्यायाची आणि समतेची मूल्ये स्वीकारणारे व्हावेत ही अपेक्षा होती. तेच कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी आज पुन्हा एकदा प्रबुद्ध भारत या नियतकालिकाची गरज निर्माण झाली आहे. बहुजन, दलित, कष्टकरी समुहाचे प्रश्न ऐरणीवर आणणारे व फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचार दृष्टीकोनातून देशविदेशातील घडामोडींची माहिती देणारे माध्यम असले पाहिजे. म्हणूनच पुन्हा नव्या स्वरूपात हे पाक्षिक म्हणून सुरू करत आहोत. तसेच या अंकाची ई-आवृत्तीही सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)