पुरे झाली मदत... आता हवा हक्क!
By admin | Published: October 19, 2015 02:55 AM2015-10-19T02:55:01+5:302015-10-19T02:55:01+5:30
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून शासनही सरसावले. नंतर अनेक ‘सामाजिक नेते’ही पुढे आले. पण नुसत्या आर्थिक मदतीने सावरण्याच्या पलीकडे ही कुटुंबे गेली आहेत.
यवतमाळ : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून शासनही सरसावले. नंतर अनेक ‘सामाजिक नेते’ही पुढे आले. पण नुसत्या आर्थिक मदतीने सावरण्याच्या पलीकडे ही कुटुंबे गेली आहेत. शासकीय किंवा सामाजिक मदतीनंतर शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कितपत सुधारणा झाली, याबाबत ‘लोकमत’ने घेतलेल्या आढाव्यात अनेक धक्कादायक तथ्ये पुढे आली. मदतीपेक्षा शेतकऱ्यांना हक्क दिला गेला पाहिजे, हेच या आढाव्याचे मध्यवर्ती सूत्र...
>लाखो आले अन् सुखच हिरावले
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीमुळे प्रकाशझोतात आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्याच्या जळका येथील कलावती बांदुरकर या शेतकरी विधवेने पतीच्या आत्महत्येनंतर लाखो रुपये मिळूनही सुख हिरावल्याचे दु:ख व्यक्त केले.
परशुराम बांदुरकर या शेतकऱ्याने नापिकी व कर्जाला कंटाळून २०१४ मध्ये आत्महत्या केली होती. पतीच्या निधनानंतर सात मुली व दोन मुले सांभाळण्याचा प्रश्न कलावतीसमोर होता. तेव्हाच राहुल गांधी विदर्भाच्या दौऱ्यावर आले. त्यांनी कलावतीच्या ‘चंद्रमौळी’ झोपडीला भेट दिली.
त्यांनी कलावतीच्या वेदना देशाच्या सर्वोच्च सभागृहात मांडल्या अन् अख्ख्या देशवासीयांचे लक्ष कलावतीकडे वेधले गेले. काही दिवसांनंतर दिल्ली येथील सुलभ फाउंडेशनचे संचालक डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी कलावतीला दरमहा २५ हजार रुपये देण्याची घोषणा केली आणि कलावतीच्या जीवनाला तेथूनच कलाटणी मिळाली. ‘सुलभ’ संस्थेने कलावती बांदुरकर यांना प्रत्येकी तीन-तीन लाख रुपये दोनदा रोख स्वरूपातही प्रदान केले. या सहा लाखांतून कलावतीने पतीच्या शिरावर असलेले कृषी केंद्र, सावकार व नातेवाइकांचे कर्ज फेडले. गावात छोटेसे घरही बांधले. मुलींचे विवाह केले. ‘सुलभ’ संस्थेने कलावतीच्या नावे सेंट्रल बँकेत ३० लाख रुपये फिक्स केले. त्याच पैशाच्या व्याजावर कलावतीचा संसार नंतर सुखाने सुरू झाला. तथापि, घरात पैसा येताच दु:खही आले. तिच्या सात विवाहित मुलींपैकी पाच मुलींना पतीने त्रास द्यायला सुरुवात केली. या त्रासापायी एका मुलीने स्वत:ला जाळून घेऊन जीवनयात्राच संपवून टाकली. चार मुलींना पतींनी वाऱ्यावर सोडले. त्या जावयांनी दुसरे लग्न केले.
आता केवळ या सातपैकी दोनच मुली त्यांच्या पतीच्या घरी सासरी सुखाने संसार करीत आहेत. घरात गरिबीच्या आणि कर्जाच्या काळातही जे सुख होते, तेच आता पैसा येऊनही हिरावले गेले आहे. माहेरी परतून चार मुलींना आईसह जीवन व्यतीत करावे लागत आहे.
>छत्र गमावले... सरकारही दाद देईना !
यवतमाळ : कर्ज होते म्हणून वडिलांनी आत्महत्या केली. मग मुख्यमंत्र्यांनी आईची व्यथा जाणून घेतली. पण पैसाच न मिळाल्याने आईनेही जीव दिला. दोन जीव गेल्यावर शासनाने मदतीची रक्कम दिली. तीही सावकारांचे कर्ज फेडण्यात गेली. आता आईवडील गमावल्यावर मोहन या शेतकरीपुत्राला शेती करणेही अवघड आहे. मातीमाय पोरकी झाली.
पिंप्री बुटीतील ताजने कुटुंबीयांची कहाणी शासन आणि प्रशासनाच्या मुजोरीचे जिवंत उदाहरण आहे. प्रल्हाद बापूराव ताजने हे ७ एकर कोरडवाहू शेतीचे मालक. दीड लाखाचे सावकारी कर्ज आणि एक लाखाचे बँकेचे. या कर्जाखाली ताजने कुटुंबीय दबले होते. शेवटी २०११मध्ये प्रल्हादने आत्महत्या केली. प्रल्हादच्या कुटुंबाला १ लाख रुपयांची मदत मिळाली. मात्र, यातील २९,५०० रुपयेच प्रत्यक्ष परिवाराला मिळाले. त्यांच्या पत्नी शांताबाईच्या नावाने ७० हजारांचे डिपॉझिट ठेवले गेले. सहा वर्षे हे डिपॉझिट काढता येत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या गावात मुक्कामी राहिले. तेव्हा शांताबाईने आपली व्यथा त्यांच्यापुढे मांडली. या वेळी त्यांना विहीर देण्याचे अधिकाऱ्यांनी कबूल केले होते. पण कर्जाचा प्रश्न सुटला नव्हता. विहीरही मिळाली नव्हती. कर्जाचा सततचा तगादा असल्याने अखेर ९ जून २०१५ रोजी शांताबाईनेही आपली जीवनयात्रा संपविली. तिच्या मृत्यूनंतर ७० हजार रुपये मिळाले. शांताबाईचे पैसे मिळाल्याचे कळताच सावकारांनी त्यांचा मुलगा मोहनला गराडा घातला. सर्व पैसे सावकारांनीच नेले. शेती कशी पेरावी, हा प्रश्न कायमच राहिला. आधीचे कर्ज थकीत असल्याने बँकेने नवीन कर्ज दिले नाही. नाइलाजाने कृषी केंद्रात उधारी करूनच मोहनला पेरणी करावी लागली.
>>शशिकलाचे जीवन झाले सोन्यासारखे खास!
घरी अठराविश्व दारिद्र्य. कुटुंब चालविण्यासाठी आधार नाही. अशा स्थितीत रोजमजुरी करून तीन मुलांचे शिक्षण करणे अवघडच. अशा स्थितीत नेत्याचा एक दौरा तिला जगण्याची उमेद देऊन गेला. राहुल गांधींच्या एका भेटीनंतर तिच्याकडे आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला. या दातृत्वाचा आब राखत आज तिचा मुलगा सीआरपीएफचा जवान बनून देशरक्षणाला हातभार लावतोय. दुसराही मुलगा वनरक्षक झाला. रोजमजुरी करणाऱ्या सोनखासच्या रिंगणे कुटुंबाने आठ वर्षांनंतर आपल्या आत्मविश्वासाचे रिंगण विस्तारले आहे, ते समाजाच्या पाठबळावरच.
राहुल गांधींनी शशिकलाबार्इंची कुडाची झोपडी, त्यावर व्यवस्थित नसलेले छत टिपले. टेंभ्याच्या उजेडात तुमची मुले अभ्यास कशी करतात, असे विचारले. नंतर सुलभ इंटरनॅशनलने २० लाखांची रक्कम शशिकलाबार्इंच्या नावे बँकेत जमा केली. त्याच्या व्याजावर मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविला. त्यांचा मुलगा महेंद्र याला केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरी मिळाली. योगेश वनरक्षक आहे. जयहिंद्र बीएच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण आहे. त्यांचे कुडाचे घर आता विटा-मातीचे झाले आहे.