रंगला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’चा एंटरटेनमेंट क्लास...

By admin | Published: October 17, 2016 12:59 AM2016-10-17T00:59:07+5:302016-10-17T00:59:07+5:30

‘बम बम बोले मस्ती मैं डोले’ म्हणत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणाऱ्या ‘निकुंभ’ सरांचे तारे पुनश्च जमीनपर अवतरले

Entertainment Class of 'Mr. Perfectionist' Rangla ... | रंगला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’चा एंटरटेनमेंट क्लास...

रंगला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’चा एंटरटेनमेंट क्लास...

Next


पुणे : ‘बम बम बोले मस्ती मैं डोले’ म्हणत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणाऱ्या ‘निकुंभ’ सरांचे तारे पुनश्च जमीनपर अवतरले... आणि ‘चित्र’ नव्हे तर अभिनय, नृत्य, गायन अशा विविध कलांच्या सादरीकरणातून ‘एंटरटेनमेंट’चा हा क्लास उत्स्फूर्तपणे रंगला... सशक्त अभिनेता, मिस्टर परफेक्शनिस्ट’ असे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे सगळे अभिनिवेश गळून पडले ...प्रत्येक चित्रपटात ‘हटके’ देणारा तो मुलांच्या एकसे बढकर एक ‘बाललीलांनी’ पूर्णत: भारावून गेला... प्रत्येक सादरीकरणाला त्याने दिलेली दिलखुलास दाद मुलांना प्रोत्साहन देणारी ठरली... ‘सब तारे हैं’ या त्याच्या उद्गाराने जादू केली... अन् मुलांच्या ओठावर चटकन हसू तरळले... हा अविस्मरणीय क्षण त्याने ‘सेल्फी’मध्ये बंदिस्त केला.
रविवारचा दिवस आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासह आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात काहीसा खासच होता... भारतीय जैन संघटनेच्या वतीने वाघोली येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील या मुलांशी आमिर खानच्या संवादाचा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. ‘तो येणार’ याचा आनंद प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता... अखेर तो आला आणि येताच ‘नमस्कार’ या त्याच्या मराठमोळ््या शब्दाने दुष्काळाच्या तळपत्या ढगाखाली होरपळून गेलेल्या त्या कोवळ्या मनांवर वर्षासरींचा शिडकावा केला... आज तो नव्हे तर मुलेच ‘एंटरटेनर’ची भूमिका बजावत होती... कुणी त्याला नृत्य करून दाखवत होता... कुणी गाणं तर कुणी नाटकातला छोटा संवाद सादर करीत होता... या प्रत्येक सादरीकरणाने तो खूपच भारावून गेला...‘गेली माझी सख्खी बायको गेली’ या भारुडाच्या सादरीकरणाला त्याने मनमोकळेपणाने दाद दिली...
कोणतीही भाषणबाजी न करता मुलांच्या निरागस प्रश्नांना तो दिलखुलासपणे उत्तरे देत होता... तुम्हाला मुलं का आवडतात? असा प्रश्न एका मुलाने विचारला, त्यावर तो म्हणाला, की मुलांमध्ये निरागसता असते़ प्रत्येक गोष्टी जाणून घेण्याची त्यांची इच्छा असते. त्यांचा नटखटपणा जास्त भावतो. एक प्रश्न संपतो ना संपतो तोवर त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरूच होती. समाजसेवेकडे कसे वळलात? ‘सत्यमेव जयते’चा उद्देश काय? ‘पानी फाऊंडेशन’ स्थापनेमागचा हेतू काय? पीके आणि दंगल चित्रपट कशावर भाष्य करतो? असे अनेक प्रश्न मुलांनी विचारले आणि त्याची त्याने मनमोकळेपणे उत्तरे दिली. ‘सत्यमेव जयते’मध्ये विविध विषयांवर भाष्य केले मात्र एक मुद्दा घेऊन काम केले पाहिजे, या हेतूने ‘पाणी’ या विषयावर काम करायचे ठरवले. समाजाप्रती आपलेही काही उत्तरदायित्व आहे, कलाकार म्हणून रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचू शकतो आणि समाजात एकता निर्माण करू शकतो, असे सांगत ‘आपकी जिंदगी खुशी से भरी हो, आप कामयाब हो’ अशी प्रार्थना त्याने केली आणि ‘आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके’ हे गाणे सादर करून त्याने मुलांची मने जिंकली. याप्रसंगी भारतीय जैन संघाचे संस्थापक शांतिलाल मुथा, शांतिलाल बोरा, विठ्ठल मणियार, अभय मुनोत, किंजल गोयल, बाबासाहेब सांगळे आणि समीर मुथा उपस्थित होते.
(प्रतिनिधी)
>छोरीयाँ छोरोंसे कम नहीं हैं
‘दंगल’ या आगामी चित्रपटाबद्दल सांगताना आमिर खान म्हणाला, की दंगलमध्ये कोणत्याहीबाबतीत मुली मुलांपेक्षा कमी नाहीत, असा संदेश देण्यात आला आहे. दंगलची कथा कुस्तीला केंद्रस्थानी ठेवून गुंफण्यात आली आहे. मुलींना कुस्ती शिकवताना म्हारी छोरीयाँ छोरोंसे कम नहीं हैं... असे तो सांगतो.
आमिरने महाराष्ट्र दुष्काळग्रस्त करण्याचा निर्णय पुण्यात जाहीर केला आहे़ ही मुले या चळवळीच्या पाठीमागे उभी राहतील. या प्रकल्पाअंतर्गत मुलांना देण्यात येणारे शिक्षण ही एक प्रयोगशाळा आहे. हीच मुले समाजात परिवर्तन घडवतील. येत्या एप्रिलमध्ये प्रत्येक मुलाच्या जिल्ह्यात जाऊन श्रमदान करण्यात येईल.
- शांतिलाल मुथा

Web Title: Entertainment Class of 'Mr. Perfectionist' Rangla ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.