गोपीक्रिष्ण जयंती नृत्य महोत्सवाचा उत्साहात समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2016 04:44 PM2016-08-25T16:44:26+5:302016-08-25T16:44:26+5:30

अशोक राजा अध्यात्माच्या वाटेकडे कसा वळतो याचा अनोखा प्रवास बेंगळुरू येथील नृत्य कलाकार तेजेशकुमार एम. यांनी आपल्या नृत्यातून सादर केला

The enthusiasm of Gopichrishna Jayanti Dance Festival concluded | गोपीक्रिष्ण जयंती नृत्य महोत्सवाचा उत्साहात समारोप

गोपीक्रिष्ण जयंती नृत्य महोत्सवाचा उत्साहात समारोप

Next

ऑनलाइन लोकमत
नाशिक : सम्राट अशोकाचे युद्ध कौशल्य, त्याच्या अंगी असलेली लवचिकता, साम्राज्य हस्तगत झाल्यावर सम्राट अशोकाच्या अंगात भिनलेला गर्विष्ठपणा, याच गर्विष्ठपणामुळे सम्राट अशोकाला वैयक्तिक आयुष्यात होणारा पश्चाताप आणि पश्चातापातून अशोक राजा अध्यात्माच्या वाटेकडे कसा वळतो याचा अनोखा प्रवास बेंगळुरू येथील नृत्य कलाकार तेजेशकुमार एम. यांनी आपल्या नृत्यातून सादर केला. बुधवारी (दि. २४) महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित गोपीक्रिष्ण जयंती नृत्य महोत्सवात त्यांनी आपली कला पेश केली.

तेजेशकुमार एम. यांनी कलरीपायटू ही नृत्यकला सादर करताना ‘आर्यसच्चा’ या संकल्पनेतील नृत्य सादर केले. यावेळी दु:ख, समुदाय, निरोदा आणि मगा या चार महान सत्यातून सम्राट अशोकाचा जीवनपट नृत्यकलेतून उलगडून दाखविण्यात आला.

कलरीपायटू या नृत्य कलेतून युद्ध कौशल्याचे दर्शन तेजेशकुमार यांनी घडविताना आपल्या लवचिक शरीरयष्टीतून साहसी, क्रोधीत स्थळांचे दर्शन घडवून रसिकांची विशेष दाद मिळवली. नृत्याविष्काराबरोबरच विद्युत रोषणाईचा अगदी चपखलपणे वापर करून समकालीन नृत्य आणि कलरीपायटू या दोन्ही नृत्याचा मिलाफ सादर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

नृत्यमहोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात केरळ येथील कलाकार रेनजीश नायर आणि नारायणन नेदुमबल्ली यांनी कथकली नृत्यप्रकाराचे सादरीकरण केले. या कथकली नृत्यातून बकासुराच्या वधाची कथा सादर करण्यात आली. फक्त चेहऱ्यावरील हावभाव आणि डोळ्यांची केलेली वैशिष्ट्यपूर्ण हालचाल यातून हा प्रसंग उत्कृष्टरीत्या नृत्यकलाकारांनी मांडला. भीम आणि बकासूर यांच्यातील युद्धाचा प्रसंग वर्णन करताना दोन्ही कलाकारांमध्ये रंगलेल्या जुगलबंदीला प्रेक्षकांनी विशेष दाद दिली.

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पंडित गोपीक्रिष्ण जयंती महोत्सवाचा बुधवारी समारोप झाला. या महोत्सवाअंतर्गत कुचीपुडी, कथक, ओडीसी, भरतनाट्यम्, कलरीपायटू आणि कथकली या नृत्यप्रकारातून भारतीय नृत्यशैलीचे विविध पैलू अनुभवायला मिळाले. 

Web Title: The enthusiasm of Gopichrishna Jayanti Dance Festival concluded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.