भुजबळांच्या प्रवेशावर शिवसेनेतच दोन गट; जुन्या शिवसैनिकांचा पाठिंबा, नव्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 05:01 AM2019-08-31T05:01:54+5:302019-08-31T05:02:02+5:30
संजय पाठक । लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा असून ...
संजय पाठक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा असून त्यांच्या संभाव्य प्रवेशावरून शिवसेनेतच दोन गट पडल्याचे दिसून येते. जुन्या शिवसैनिकांचा भुजबळांना पाठिंबा, तर विद्यमान पदाधिकाऱ्यांचा विरोध, असे चित्र आहे.
२८ वर्षांपूर्वी छगन भुजबळ यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर ते राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये दाखल झाले.
पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्रिपद दिले. ओबीसी समाजातील प्रमुख नेते अशी ओळख असलेले भुजबळ धडाडी आणि स्पष्टवक्तेपणामुळे सतत चर्चेत असतात. गृहमंत्री असताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचे धाडस दाखवले होते. तेव्हापासून शिवसैनिकांचा त्यांना कडवा विरोध आहे. मात्र, गेल्या काही वर्षात बरेच पाणी वाहून गेले. स्वत: भुजबळ मातोश्रीवर जावून बाळासाहेबांना भेटले होते. त्यानंतर भुजबळ आणि शिवसेना यांच्यातील कटुता मावळली.
बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्टÑ सदन घोटाळा या प्रकरणात भुजबळांना ईडीने अटकही केली. दीड ते दोन वर्ष ते कोठडीत होते. सध्या ते जामिनावर आहेत. या प्रकरणांमुळे त्यांच्याविषयी द्वेष करणारा जसा वर्ग आहे, तसे सहानुभुती बाळगणारेही आहेत. या प्रकरणांतून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी त्यांना सत्तेची जवळीक हवी आहे, असे काहींना वाटते. राष्टÑवादी काँग्रेसची सध्या शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. मात्र भुजबळ अजून या यात्रेकडे फिरकले नाही. राष्टÑवादीपासून त्यांनी अंतर राखल्याचे दिसून येते. मात्र, स्वत: भुजबळ यांनी याचा इन्कार केला आहे. शिवसेना प्रवेशाच्या वृत्ताचाही त्यांनी इन्कार केला आहे.
दुसरीकडे भुजबळांच्या संभाव्य शिवसेनाप्रवेशावरून शिवसैनिकांत दोन गट पडल्याचे दिसून येते. गेल्याच आठवड्यात नाशिकमधील काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन भुजबळांना पक्षात घेण्यास विरोध दर्शविला. भुजबळ यांच्या आगमनाने पक्षाची हानी होईल, असे त्यांनी सांगितले. तर भुजबळ शिवसेनेत यावेत, असाही एक मतप्रवाह आहे. विशेषत: अनेक जुने शिवसैनिक जे भुजबळ यांच्या तालमीत तयार झाले, ते भुजबळांच्या शिवसेना प्रवेशास अनुकुल आहेत. परंतु यासंबंधीचा निर्णय ‘मातोश्री’वर सोपविला आहे.
छगन भुजबळ यांना शिवसेना ज्ञात आहे. त्यांना पक्षात घ्यावे किंवा न घ्यावे या विषयावर बोलण्याइतपत मी मोठा नेता नाही. त्यासंदर्भात पक्षाचे नेते उद्धव ठाकरे हेच योग्य तो निर्णय घेतील.
- विनायक पांडे, माजी महापौर, शिवसेना, नाशिक