वैद्यकीय प्रवेशातील ‘गुणदान’ बंद
By Admin | Published: July 10, 2017 04:27 AM2017-07-10T04:27:29+5:302017-07-10T04:27:29+5:30
वीस वर्षांपासून वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी खेळाडू, एनसीसी व इतर काही विद्यार्थ्यांना दिले जाणारे अतिरिक्त गुणदान अखेर बंद करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वीस वर्षांपासून वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी खेळाडू, एनसीसी व इतर काही विद्यार्थ्यांना दिले जाणारे अतिरिक्त गुणदान अखेर बंद करण्यात आले आहेत. मागील वर्षी राज्याच्या विधी व न्याय विभागाने त्यावर आक्षेप घेत प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात हे गुण न देण्याचे फर्मान सोडले होते.
एमबीबीएस, बीडीएससह सर्व वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी अतिरिक्त गुण ग्राह्य धरले जात होते. खेळाडू, एनसीसीचे विद्यार्थी, हैदराबाद-गोवा मुक्ती लढा आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना त्याचा लाभ मिळत होता.
चारही घटकांसाठी प्रत्येकी
दोन गुण दिले जात होते. प्रवेश परीक्षेचे गुण व अतिरिक्त गुण एकत्रित करून अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जात होती. अनेक विद्यार्थ्यांना २ ते ८ गुण मिळत असल्याने फायदा व्हायचा.
राज्य सामाईक प्रवेश कक्षामार्फत २० अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. वैद्यकीय वगळता इतर कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी असे अतिरिक्त गुण दिले जात नाही, ही बाब विधी विभागाने मांडली होती. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने त्यास विरोध दर्शविला होता. विधी विभागाने सुरूवातीला परवानगी दिली. मात्र नंतर अतिरिक्त गुण देण्याचा प्रस्ताव अमान्य केला होता.
>अर्ज करण्यासाठी आज अखेरची मुदत
एमबीबीएस व बीडीएससह विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याची सोमवारी अंतिम मुदत आहे. ५ वाजेपर्यंत आॅनलाइन अर्ज भरता येतील. १२ जुलैला प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. हरकतींनंतर १४ जुलैला सुधारित यादी प्रसिद्ध होईल. चार केंद्रांवर कागदपत्रांची पडताळणी होईल. त्यानंतर २४ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल.
नीट गुणांवरच प्रवेश
यंदा केवळ ‘नीट’ गुणांच्या आधारेच प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना त्यात अतिरिक्त गुण दिले जाणार नाहीत. केवळ ‘नीट’मधील गुणांच्या आधारेच गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
- डॉ. प्रवीण शिनगारे,
वैद्यकीय शिक्षण संचालक