गाभारा प्रवेशाचा वाद पोहोचला शिगेला!
By admin | Published: April 5, 2016 02:31 AM2016-04-05T02:31:44+5:302016-04-05T02:31:44+5:30
शनी शिंगणापूर चौथरा प्रवेशाच्या महिला आंदोलनाचे पडसाद सोमवारी कोल्हापूर व त्र्यंबकेश्वरमध्ये उमटले. करवीरनिवासिनी अंबाबाई देवी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा महिलांनी प्रयत्न केला
कोल्हापूर/नाशिक : शनी शिंगणापूर चौथरा प्रवेशाच्या महिला आंदोलनाचे पडसाद सोमवारी कोल्हापूर व त्र्यंबकेश्वरमध्ये उमटले. करवीरनिवासिनी अंबाबाई देवी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा महिलांनी प्रयत्न केला, मात्र स्थानिक महिलांनी त्यांना धक्काबुक्की करत पिटाळून लावले. तर त्र्यंबकेश्वर देवस्थानने गाभाऱ्यात पुरुषांनाही बंदी केल्याच्या विरोधात सगळेच पुरुष मैदानात उतरले, त्यांनी निषेध मोर्चा काढला.
देवीच्या गाभाऱ्यात जाऊन ओटी भरण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘अवनि’ संस्थेच्या अनुराधा भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांना स्थानिक महिलांनी धक्काबुक्की केल्याने एकच गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांनी सर्वच महिलांना मंदिरातून बाहेर काढले. त्यातच जुना राजवाडा पोलिसांनी भोसले यांना आंदोलनामुळे भाविकांचे दर्शन खोळंबल्याची नोटीस दिली तर भोसले यांनी धक्काबुक्की करणाऱ्या महिलांविरोधात कारवाई करा, अशी तक्रार दिली.
त्र्यंबकेश्वरमध्ये पुरुषांना गाभारा बंदी करण्याच्या विरोधातील मोर्चात नगराध्यक्षांसह संपूर्ण गावच सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांनी देवस्थान ट्रस्ट कार्यालयात ठिय्या मांडला होता. वाद होऊ नये म्हणून सध्या गाभाऱ्यात पुरुषांनाही बंदी केल्याचे देवस्थानचे विश्वस्त यादवराव तुंगार यांनी सांगितले. पुरुषांना वेठीस धरून त्यांचे दर्शन बंद करू नका, अशी विनंती शिवसेनेतर्फे विश्वस्त मंडळाला करण्यात आली आहे.
तृप्ती देसाई रुग्णालयात
शिंगणापूरमध्ये धक्काबुक्की झालेल्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांना सोमवारी छातीत दुखत असल्याने पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना स्थानिक महिलांकडून मारहाण झाली होती. (प्रतिनिधी)उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आम्ही अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात आलो होतो. मात्र आम्हाला गाभाऱ्यात प्रवेश करू दिला नाही. राजघराण्यातील स्त्रियांबरोबरच सामान्य महिलांना मंदिरात प्रवेश द्या.
- अनुराधा भोसले,
‘अवनि’ संस्था