प्रवेशपत्राअभावी परीक्षेला मुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 02:17 AM2016-10-19T02:17:41+5:302016-10-19T02:17:41+5:30
विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात (टीवायबीएस्सी) शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले आहे
मुंबई : गिरगाव चौपाटी येथील भवन्स महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात (टीवायबीएस्सी) शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले आहे. महाविद्यालय प्रशासनाने प्रवेशपत्र (हॉलतिकीट) दिले नाही, म्हणून परीक्षेला मुकावे लागल्याचा आरोप संबंधित विद्यार्थ्यांनी केला आहे.
अन्य विद्यार्थ्यांनाही हॉलतिकीट मिळविण्यासाठी कसरत करावी लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांच्या तृतीय वर्ष बीएस्सीच्या परीक्षा मंगळवारी सुरू झाल्या. मात्र भवन्स महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसता आले नाही, म्हणून थेट गावदेवी पोलीस ठाणे गाठले. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. काही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक तास आधीच हॉलतिकीट मिळाल्याचा आरोपही संबंधित विद्यार्थ्यांनी केला आहे.
यासंदर्भात महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे सादर करण्यात आलेली नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचे पीएनआर क्रमांक आले नाही. ही महाविद्यालयाची चूक असून मंगळवारी झालेला पेपर पुन्हा घेण्यात येणार नाही, अशी प्रतिक्रिया विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी दिली. तर महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला असता, अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.