Avinash Bhosale: उद्योजक अविनाश भोसलेंना दहा दिवसांची सीबीआय कोठडी; येस बँक-डीएचएफएल घोटाळा प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 05:58 PM2022-05-31T17:58:58+5:302022-05-31T18:07:04+5:30
Avinash Bhosale: सीबीआयने अविनाश भोसले यांना 26 मे रोजी पुण्यातून अटक केली होती.
मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना मुंबईतील सीबीआय विशेष न्यायालायाने 10 दिवसांची कोठडी सुनावली आहे. येस बँक आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या (डीएचएफएल) घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अविनाश भोसले यांना अटक केली आहे. दरम्यान, सीबीआयने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा अविनाश भोसले यांचा दावा कोर्टाने फेटाळला आहे. तसेच, सीबीआयला अविनाश भोसले यांना मुंबईबाहेर नेण्यास मनाई कोर्टाने केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून येस बँक आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या (डीएचएफएल) घोटाळ्याप्रकरणी अविनाश भोसले सीबीआयच्या रडारवर होते. सीबीआयने अविनाश भोसले यांना 26 मे रोजी पुण्यातून अटक केली होती. त्यानंतर मुंबईतील सीबीआय कोर्टात त्यांना 27 मे रोजी हजर करण्यात आले होते. सीबीआयने अविनाश भोसले यांची 10 दिवसांकरता कोठडी मागितली होती. मात्र, सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत अविनाश भोसले यांच्या वकिलांनी कोठडीला विरोध केला होता. कोर्टाने हा दावा फेटाळला आहे.
नेमके प्रकरण काय?
सीबीआयने डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी अविनाश भोसले यांच्यावर ही कारवाई केली. अविनाश भोसले यांचे नाव येस बँक घोटाळाप्रकरणीही चर्चेत होते. या दोन्ही प्रकरणाची सीबीआयने चौकशी सुरू केली होती. शिवाय, याप्रकरणी पुणे - मुंबई परिसरातील तब्बल 8 ठिकाणी छापेमारी केली होती. या छाप्यातून सीबीआयच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याचे समजते. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे.
कोण आहेत अविनाश भोसले?
अविनाश भोसले हे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या बांधकाम कंपनीचे मालक आहेत. त्यांचा जन्म संगमनेर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील निवृत्ती गणपत भोसले हे संगमनेर येथील सावर्जनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता होते. रोजगाराच्या शोधात पुण्यात आलेल्या अविनाश भोसले यांनी रिक्षाचालक म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी बांधकाम क्षेत्रात उडी घेतली. रिक्षा चालक ते मोठे बांधकाम व्यावसायिक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. तसेच, अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.
याआधी जप्त झाली होती मालमत्ता
ईडीने याआधी अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने आतापर्यंत अविनाश भोसले यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई आहे.