उद्योजक भंवरलाल जैन यांचे निधन
By Admin | Published: February 26, 2016 04:49 AM2016-02-26T04:49:09+5:302016-02-26T04:49:09+5:30
जळगावचे नाव जगाच्या नकाशावर अधोरेखित करणारे जैन इरिगेशनचे संस्थापक भंवरलाल जैन (७८) यांचे गुरुवारी दुपारी ४ वाजता मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना
जळगाव : जळगावचे नाव जगाच्या नकाशावर अधोरेखित करणारे जैन इरिगेशनचे संस्थापक भंवरलाल जैन (७८) यांचे गुरुवारी दुपारी ४ वाजता मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले. शनिवारी दुपारी ३ वाजता जैन हिल्स येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून जैन यांची प्रकृती बरी नसल्याने, मुंबई येथील जसलोक रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी जिल्ह्यातील शेतकरी, सामाजिक व विविध संस्थांतर्फे सामूहिक प्रार्थनाही झाल्या. ते उपचारांना प्रतिसाद देत असताना गुरुवारी मात्र त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांच्या पश्चात अशोक, अनिल, अजित व अतुल जैन हे पुत्र, स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे.
जैन यांचा जन्म वाकोद (ता. जामनेर) येथे १२ डिसेंबर १९३७ रोजी झाला होता. जळगाव ही त्यांची कर्मभूमी होती. जैन उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी हजारो युवक, तज्ज्ञांना रोजगार दिला. ‘लाखोंचा पोशिंदा’ म्हणूनही ते ओळखले जायचे. त्यांनी केळीचे उतिसंवर्धित रोपांचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दिले त्यामुळे केळीच्या उत्पादकतेमध्ये मोठी वाढ झाली. सूक्ष्मसिंचन तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठीही त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांना पद्मश्री तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना, वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई यांच्यातर्फे जीवनगौरव आदी प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले होते; तर कोईम्बतूर कृषी विद्यापीठ, कोकण कृषी विद्यापीठ, उदयपूर येथील कृषी व तंत्रज्ञान संस्था यांनी डॉक्टर आॅफ सायन्स व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने डी.लीट पदवी देऊन सन्मानित केले होते. (प्रतिनिधी)
ज्ञानाला परिश्रमाची जोड देऊन लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात प्रगतीचा प्रकाश पसरविणारे ज्येष्ठ उद्योगपती भंवरलालजी जैन यांच्या निधनाने सिंचनक्रांतीचा प्रणेता हरपला आहे. जगातील तिसरे महायुद्ध पाण्यासाठीच होईल या दूरदृष्टीतून भंवरलालजींनी ठिबक सिंचन पद्धतीचा कृतिशील आग्रह धरला. देशात ‘स्टार्ट अप’ची चर्चा आज होत आहे, पण भंवरलालजींनी सुमारे पन्नास वर्षांपूर्वी प्रतिकूल परिस्थितीतही उद्यमशीलतेचा मार्ग अनुसरला. जीवननिष्ठेने उद्योगांची उभारणी केली. परिश्रमावर नितांत श्रद्धा ठेवत या भूमिपुत्राने समाजाभिमुख उद्योगाची कार्यसंस्कृती निर्माण केली. शून्यातून नवे विश्व निर्माण केले. जैन उद्योग समूहाच्या माध्यमातून जळगावची पताका आज संपूर्ण जगभर फडकत आहे. सामाजिक जाण आणि भान ठेवून सातत्याने समाजाचा विचार करणारे भंवरलालजी हे एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते आणि महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींविषयी ते सजग असायचे. अनेक संस्थांच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. दर्डा कुटुंबीयांशी त्यांचे अतुट भावबंध होते आणि लोकमत परिवाराचे ते ज्येष्ठ मार्गदर्शक होते. भंवरलालजींच्या जाण्याने माझे मन अतिशय हळवे आणि व्यथित झाले आहे. त्यांच्या सहवासातील अनंत आठवणी डोळ्यासमोर तरळत आहेत. जळगावात ते नसतील ही कल्पनाच मनाला सहन होत नाही. भंवरलालजींच्या निधनाने जळगाव आणि महाराष्ट्राचेच नव्हे तर या देशाचेही अपरिमित नुकसान झाले आहे.
- खासदार विजय दर्डा, चेअरमन, लोकमत मीडिया प्रा. लि.
ज्येष्ठ उद्योगपती भंवरलालजी जैन यांच्या निधनाने एक कर्मयोगी हरपला आहे. श्रमसंस्कृती आणि कृषीसंस्कृती ही जीवननिष्ठा मानून ते समर्पित भावनेने कार्यरत राहिले. आयुष्यातील खडतर परिस्थिती बदलण्यासाठी प्रशासनात उच्च पदावर चालून आलेली नोकरी नाकारून या भूमिपुत्राने शेतीपूरक उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली आणि इतिहास निर्माण केला. आपल्यासोबतच लोकांचेही जीवनमान बदलून त्यांचीही उन्नती व्हावी, माणसापासून ते प्राणिमात्रांचीही सेवा घडावी हीच त्यांची प्रेरणा होती. जैन उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी हजारो लोकांचे आयुष्य घडविले. शेती संशोधनात त्यांनी नवनवीन प्रयोग केले. कालदर्शी असणाऱ्या भंवरलालजींनी पाण्याचे महत्त्व ओळखून ठिबक सिंचनाचा कृतिशील पुरस्कार करीत कृषिक्षेत्रात क्रांती केली. उद्योग-व्यवसायाच्या पलीकडे जात सामाजिक बांधिलकी जोपासली. जळगावचे नाव जगाच्या नकाशावर नेताना त्यांनी आपल्या मातीशी नाते कधीही तोडले नाही. माझे वडील जवाहरलालजी दर्डा आणि त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांच्या निधनाने खान्देश आणि महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. - राजेंद्र दर्डा, एडिटर-इन-चिफ, लोकमत वृत्तपत्र समूह
पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कृषी आणि
सिंचन क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या जैन यांच्या निधनाने देशातील
ठिबक क्रांतीचा प्रणेता आपण गमावला आहे. शेतकऱ्यांचे आयुष्य सुखी आणि समृद्ध व्हावे, हा ध्यास जैन यांनी आयुष्यभर जोपासला. महात्मा गांधीजींच्या विचारांवर निष्ठा असणारे जैन हे तरुणांसाठी उद्यमशीलतेचे नेहमीच प्रेरणास्रोत राहिले आहेत. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री