२८८ सदस्यांच्या विधानसभेत १० मुस्लीम आमदारांची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 01:04 PM2019-10-26T13:04:36+5:302019-10-26T13:04:57+5:30

एमआयएमचे दोन; काँग्रेसमधील सर्वाधिक तिघांचा समावेश

Entry of 3 Muslim MLAs in the 3-member assembly of maharashtra | २८८ सदस्यांच्या विधानसभेत १० मुस्लीम आमदारांची एन्ट्री

२८८ सदस्यांच्या विधानसभेत १० मुस्लीम आमदारांची एन्ट्री

googlenewsNext

खलील गिरकर 

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या गुरुवारी जाहीर झालेल्या २८८ मतदार संघाच्या मतमोजणीत राज्यातील १० मुस्लीम उमेदवार विजयी झाले आहेत. या दहापैकी ५ आमदार मुंबईतील आहेत. या आमदारांमध्ये काँग्रेसच्या तीन जणांचा, एमआयएमच्या दोन जणांचा, समाजवादी पक्षाच्या दोन जणांचा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघांचा व शिवसेनेच्या एका आमदाराचा समावेश आहे.

समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी हे मानखुर्द शिवाजीनगर मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले, तर त्यांच्याच पक्षातीलमुंबई महापालिकेतील गटनेते रईस शेख हे भिवंडी पूर्व मतदार संघातून पहिल्यांदा आमदार म्हणून विजयी झाले आहेत.
काँग्रेसच्या उमेदवारीवर मालाड पश्चिममधून अस्लम शेख हे तिसऱ्यांदा विजयी झाले, तर मुंबादेवी मतदार संघातून अमीन पटेल हेदेखील तिसºयांदा विजयी झाले आहेत. वांद्रे पूर्व मतदार संघातील अटीतटीच्या लढतीत झीशान सिद्दीकी पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. अवघ्या २७ वर्षांचे झीशान हे राज्यातील सर्वांत तरुण आमदार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक हे अणुशक्तीनगर मतदार संघातून विजयी झाले. राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदी काम केलेल्या मलिक यांचा गेल्या निवडणुकीत पराभव झाला होता. मलिक या मतदार संघातून २००९ मध्येदेखील विजयी झाले होते. ते पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सलग पाचव्यांदा विजय मिळविला आहे, तर शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार सिल्लोड मतदार संघातून विजयी झाले आहेत. ते यापूर्वी काँग्रेसतर्फे दोन वेळा आमदार व मंत्री होते. एमआयएमचे धुळे शहर मतदार संघातून शाह फारुख अन्वर, तसेच मालेगाव मध्य येथून मुफ्ती मोहम्मद इस्माईल विजयी झाले. मुफ्ती इस्माईल यांची आमदारकीची ही दुसरी वेळ आहे.

२०१४च्या विधानसभेत आमदार असलेल्या मुस्लीम आमदारांपैकी काँग्रेसचे माजी मंत्री आरिफ नसीम खान हे चांदिवली मतदार संघातून पराभूत झाले. भायखळा मतदार संघातून एमआयएमचे अ‍ॅड. वारीस पठाण पराभूत झाले. मालेगाव मध्य येथे काँग्रेसचे आसिफ शेख यांनादेखील पराभवाचा सामना करावा लागला, तर औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील खासदार झाल्याने यावेळी रिंगणात नव्हते.
काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांना मीरा-भार्इंदर मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. भिवंडी पश्चिमेतून शोएब खान, मुंब्रा-कळवा येथून आपच्या डॉ. अबू अल्तमश फैजी, औरंगाबाद पूर्वेत डॉ. गफ्फार कादरी तर, अकोला येथून साजीद खान यांचा पराभव झाला.

यंदाच्या निवडणुकीत एका आमदारामध्ये वाढ
च्२०१४ च्या विधानसभेत काँग्रेसचे ५ मुस्लीम आमदार, एमआयएमचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे एक, समाजवादी पक्षाचे एक असे ९ आमदार होते. त्यांच्यामध्ये वाढ होऊन आता १० आमदारांचा विधानसभेत प्रवेश होत आहे. २०१४ च्या विधानसभेतील आमदारांपैकी काँग्रेसच्या आमदारांपैकी आरिफ नसीम खान यांचा पराभव झाला. तर, अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक यांचा पुन्हा विधानसभेत प्रवेश झाला. मालेगावमध्ये काँग्रेसचे आमदार आसिफ शेख यांचा एमआयएमच्या मुफ्ती इस्माईल यांनी पराभव केला. एमआयएमच्या वारीस पठाण यांना देखील पराभवाचे तोंड पाहावे लागले.

Web Title: Entry of 3 Muslim MLAs in the 3-member assembly of maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.