पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 08:41 PM2024-10-18T20:41:15+5:302024-10-18T21:05:54+5:30

शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

Entry into the party and lottery within a month Harshvardhan Patil got an important responsibility from Sharad Pawar | पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!

पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!

Harshwardhan Patil ( Marathi News ) : भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून महायुतीसोबत असल्याने हर्षवर्धन पाटील यांची कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांची इंदापुरातून उमेदवारीही निश्चित झाली. अशातच शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

हर्षवर्धन पाटील यांची आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाकडून याबाबतचे नियुक्तीपत्र देताना हर्षवर्धन पाटील यांना उद्देशून म्हटलं आहे की, "सप्रेम नमस्कार, आपणास कळविण्यात आनंद होत आहे की प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये (पार्लमेंटरी बोर्ड) मध्ये नियुक्ती करण्यात येत आहे. या संसदीय मंडळाची बैठक शनिवार, दि. १९/१०/२०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वा. राष्ट्रवादी भवन, ठाकरसी हाऊस, जे. एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- ४००००१ येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस आपण उपस्थित राहावं," असं आवाहन पाटील यांना करण्यात आलं आहे.

दरम्यान, भाजप प्रवेशानंतर काहीसे अडगळीत पडलेले हर्षवर्धन पाटील यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याने आता ते पुन्हा एकदा राज्य पातळीवर सक्रिय होताना पाहायला मिळू शकतात.

पाटलांच्या प्रवेशाने इंदापुरात कोंडी

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना शरद पवारांच्या पक्षाची उमेदवारी जाहीर होताच इंदापूर मध्ये तिसरी आघाडी निर्माण होऊन निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. ज्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांचा पक्ष प्रवेश झाला त्याच ठिकाणी जनता मेळावा घेतला. आप्पासाहेब जगदाळे गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु एकदा दत्तात्रय भरणे यांनी तर दोन वेळा हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना भावनिक करुन, जगदाळे यांना उमेदवारीपासून वंचित ठेवले आहे. आपल्या सरळ स्वभावाचा फायदा त्यांनी घेतल्याचा आरोप जगदाळे यांनी अनेकदा केला आहे.  

दुसरीकडे, प्रवीण माने यांनी लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी सुमारे ८० गावात खा. सुप्रिया सुळे यांचा एकहाती प्रचार केला आणि प्रचाराला रीतसर प्रारंभ होण्याच्या एक दिवस आधी खा.सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर परत ते शरद पवारांकडे आले. ही जी धरसोडीची भूमिका घेतली ती शरद पवारांना आवडली नाही. हे त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या टीकेवरुन स्पष्ट झाले होते. त्यांना उमेदवारी न देण्यामागे हीच बाब कारणीभूत असावी असं जाणकारांना वाटत आहे.

Web Title: Entry into the party and lottery within a month Harshvardhan Patil got an important responsibility from Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.