CoronaVirus : चिंता वाढली! भारतात Corona च्या नव्या व्हेरिअंटची एन्ट्री, मुंबईत XE आणि कप्पाची पहिली केस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 06:00 PM2022-04-06T18:00:42+5:302022-04-06T18:04:19+5:30

नागरिकांनी गाफील न राहता कोविड प्रतिबंधक वर्तन स्वयंस्फूर्तीने कायम ठेवले पाहिजे. मुखपट्टी (मास्क) चा स्वेच्छेने किमान गर्दीच्या ठिकाणी उपयोग करणे, सुरक्षित अंतर राखणे, हातांची स्वच्छता आदी नियमांचे पालन केले पाहिजे.

Entry of new variant of Corona virus in India one case of kappa variant and one case of xe variant found in mumbai Maharashtra | CoronaVirus : चिंता वाढली! भारतात Corona च्या नव्या व्हेरिअंटची एन्ट्री, मुंबईत XE आणि कप्पाची पहिली केस

CoronaVirus : चिंता वाढली! भारतात Corona च्या नव्या व्हेरिअंटची एन्ट्री, मुंबईत XE आणि कप्पाची पहिली केस

googlenewsNext

मुंबई - कोविड-१९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणाऱ्या चाचण्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार नियमितपणे केल्या जात आहेत. या अंतर्गत अकराव्या तुकडीमध्ये मुंबईतील २३० रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला असून त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यात ‘ओमायक्रॉन’ चे २२८ अर्थात ९९.१३ टक्के रुग्ण आढळले आहेत. तर उरलेल्या दोन बाधितांपैकी एक जण ‘कापा’ उपप्रकाराने तर अन्य एक जण ‘एक्सई’ उपप्रकाराने बाधित होता, असे निष्पन्न झाले आहे. 

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात स्थित नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या अकराव्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण ३७६ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील २३० रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. त्यामुळे या २३० नमुन्यांसंदर्भातील निष्कर्ष जाहीर करण्यात येत आहेत. 

या २३० रुग्णांचे वयोगटनिहाय वर्गीकरण पुढीलप्रमाणे -
•    ० ते २० वर्षे वयोगट  - ३१ रुग्ण (१३ टक्के)  
•    २१ ते ४० वर्षे वयोगट – ९५ रुग्ण (४१ टक्के)
•    ४१ ते ६० वर्षे वयोगट - ७२ रूग्ण (३१ टक्के)
•    ६१ ते ८० वयोगट - २९ रुग्ण (१३ टक्के)
•    ८१ ते १०० वयोगट - ३ रुग्ण (१ टक्के)

कोविड विषाणू उपप्रकारानुसार या २३० बाधित रुग्णांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे -
•    ओमायक्रॉन – २२८ रुग्ण (९९.१३ टक्के)
•    कापा व्हेरिअंट – १ रुग्ण (०.४३ टक्के)
•    एक्सई व्हेरिअंट – १ रुग्ण (०.४३ टक्के)

२३० पैकी २१ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले -
•    पहिला डोस घेतलेल्यांपैकी कोणालाही रुग्णालयात दाखल करावे लागले नाही.
•    दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी फक्त ९ जण रुग्णालयात दाखल. 
•    लसीचा एकही डोस न घेतलेले १२ जण रुग्णालयात दाखल.
•    रुग्णालयात दाखल एकूण २१ रुग्णांपैकी कोणालाही प्राणवायू पुरवठा किंवा अतिदक्षता उपचारांची गरज भासली नाही. 

- एकूण २३० संकलित नमुन्यांपैकी फक्त एका बाधित महिलेचा मृत्यू झाला. मात्र या मृत रुग्णाचा पोटाशी संबंधित विकारामुळे मृत्यू झाला असल्याने त्याची कोविड-इतर मृत्यू (Covid Other death) अशी नोंद करण्यात आली आहे. मृत रुग्णाचे वय ४७ वर्ष एवढे आहे. सदर मृत रुग्णाने कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले होते. 

कोविड विषाणू संसर्ग परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येवून जनजीवन आता पूर्वपदावर आले आहे. असे असले तरी जगातील अनेक भागांमध्ये कोविड संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता कोविड प्रतिबंधक वर्तन स्वयंस्फूर्तीने कायम ठेवले पाहिजे. मुखपट्टी (मास्क) चा स्वेच्छेने किमान गर्दीच्या ठिकाणी उपयोग करणे, सुरक्षित अंतर राखणे, हातांची स्वच्छता आदी नियमांचे पालन केले पाहिजे. कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर प्रत्येकाने वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेणे देखील आवश्यक आहे.

सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीकरण पूर्ण करुन घेणे देखील गरजेचे आहे. लसीकरण पूर्ण करुन घेणाऱ्यांना व कोविड प्रतिबंधक नियम पाळणाऱ्यांना विषाणू बाधेपासून सर्वाधिक संरक्षण मिळते तसेच बाधा झाली तरी त्याची तीव्रता पूर्णपणे रोखता येते. लस न घेतलेल्यांना कोविड बाधेपासून तीव्र धोका संभवतो, हा वैद्यकीय इशारा लक्षात घेता सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेवून लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.

 

Web Title: Entry of new variant of Corona virus in India one case of kappa variant and one case of xe variant found in mumbai Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.