रासायनिक प्रकल्पाने पर्यावरणाचा ऱ्हास

By Admin | Published: June 6, 2017 01:40 AM2017-06-06T01:40:49+5:302017-06-06T01:40:49+5:30

रासायनिक प्रकल्पामुळे वाढलेले जल तसेच वायू प्रदूषणाने पर्यावरणाचा झालेला ऱ्हास हा कधीही भरून न निघणारा आहे.

Environmental degradation by chemical project | रासायनिक प्रकल्पाने पर्यावरणाचा ऱ्हास

रासायनिक प्रकल्पाने पर्यावरणाचा ऱ्हास

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील रासायनिक प्रकल्पामुळे वाढलेले जल तसेच वायू प्रदूषणाने पर्यावरणाचा झालेला ऱ्हास हा कधीही भरून न निघणारा आहे. विविध रासायनिक कारखान्यांनी विविध प्रकारच्या औषधांची निर्मिती करून विविध रोगांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे कुरकुंभ येथील हजारो एकर शेतीला याचा दुष्परिणाम सोसावा लागला. रासायनिक प्रकल्पातून उत्सर्जित होणारे सांडपाणी व त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाने जीवनमान विस्कळीत होत असताना हे पुढील काळात येणाऱ्या पिढीला मोठ्या स्वरूपात भोगावे लागणार आहे.
कुरकुंभ येथे रासायनिक प्रकल्पाबरोबरच पर्यावरणावर विशेष लक्ष देणे गरजेचे होते.
या औद्योगिक क्षेत्रामधील प्रत्येक रासायनिक प्रकल्पाला नियमाद्वारे सांडपाणी प्रक्रिया केंद्राची सक्ती करणे गरजेचे असताना सुरुवातीलाच परवाने देताना अशा प्रकारच्या सर्व तपासण्या करणे आवश्यक होते.
मात्र तसे न झाल्यामुळे बऱ्याच कारखानदारांनी याचा दुरुपयोग केला व सांडपाण्यावरील खर्च वाचवण्यासाठी रासायनिक प्रक्रिया केलेले पाणी बिनधास्तपणे उघड्यावर सोडून दिले.
परिणामी आज कुरकुंभ व परिसरातील जवळपास सहा ते सात किलोमीटरपर्यंत जमिनीत रासायनिक पाण्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत.
पर्यावरणाच्या ऱ्हासाने परिसरातील जीवनमान अगदीच विस्कळीत झाले असून, पिण्याच्या पाण्यापासून ते उत्सर्जित होणाऱ्या वायूपासून विविध प्रकारच्या रोगांचे प्रादुर्भाव या परिसरात दिसू लागले आहेत. विहिरी, कूपनलिका व अन्य पाण्याच्या स्रोतांवर याचा परिणाम मोठ्या स्वरुपात दिसून आला आहे. मात्र पंचवीस वर्षे उलटूनदेखील याबाबत असलेली उदासीनता येथील सामान्य नागरिकांच्या माथी मारलेलीच दिसून येते. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कुठलाच उपाय या परिसरात केलेला दिसून येत नाही. परिणामी यापासून होणारे दुष्परिणामच येणाऱ्या काळात येथील नागरिकांना सोसावे लागणार, हेच यातून दिसून येत आहे.

Web Title: Environmental degradation by chemical project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.