इफेड्रीन प्रकरण: सुशिलकुमार असिकन्नन अटकेत?
By admin | Published: August 21, 2016 11:25 PM2016-08-21T23:25:31+5:302016-08-21T23:25:31+5:30
गुजरातमधील एक टन तीनशे किलोच्या इफेड्रीन तस्करीप्रकरणी ठाणे पोलिसांनी सुशिलकुमार असिकन्ननला बंगलोर येथून घेतले ताब्यात
जितेंद्र कालेकर/ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 21 - सुमारे अडीच हजार कोटींच्या सोलापूरमधून हस्तगत केलेल्या इफेड्रीन साठयाप्रकरणी तसेच गुजरातमधील एक टन तीनशे किलोच्या इफेड्रीन तस्करीप्रकरणी ठाणे पोलीस मागावर असलेल्या सुशिलकुमार असिकन्नन याला बंगलोर येथून रविवारी ताब्यात घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मात्र, या वृत्ताला वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून रात्री उशिरापर्यंत दुजोरा मिळाला नाही.
नवी मुंबईतील खांदेश्वर भागात राहणाऱ्या सुशिलकुमार याने आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला नसल्याचे त्याच्या पत्नीने ठाणे पोलिसांना सांगितले होते. त्याने ठाणे न्यायालयात आपल्या वकीलांमार्फत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतरही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे विकी गोस्वामी, ममता कुलकर्णी तसेच डॉ. अब्दुल्ला आणि त्याचे साथीदार हे परदेशातून तर किशोर आणि असिकन्नन हे भारतातूनच ठाणे, गुजरात तसेच केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पोलिसांना चकवा देत होते. त्यापैकी असिकन्नन पोलिसांच्या जाळयात सापडला.
त्यातील किशोरच्या शोधासाठी दोन वेळा उपनिरीक्षक अमोल वालझाडे यांचे पथक दोनवेळा गुजरातला गेले होते. त्यानंतर किशोरचे वडील माजी आमदार भावसिग, त्याची आई देवराणी, पत्नी सोनल आदींची ठाण्यात चौकशी केली होती.