इफेड्रीन: ३४० पानांचे तिसरे आरोपपत्र दाखल
By admin | Published: July 26, 2016 11:13 PM2016-07-26T23:13:45+5:302016-07-26T23:13:45+5:30
३४० पानांचे आरोपपत्र ठाणे पोलिसांनी विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांच्या न्यायालयात मंगळवारी दाखल केले.
जितेंद्र कालेकर/ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 26 - सुमारे दोन हजार कोटींच्या इफे ड्रीन प्रकरणातील सूत्रधार जयमुखी याच्या विरोधात तिसरे ३४० पानांचे आरोपपत्र ठाणे पोलिसांनी विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांच्या न्यायालयात मंगळवारी दाखल केले. सोलापुरातून देश विदेशात झालेल्या इफे ड्रीन तस्करीचा तो मुख्य सूत्रधार असल्याचे या आरोपपत्रात पोलिसांनी म्हटले आहे.
जयमुखीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. न्यायालयीन कोठडीतूनच त्याने आता पोलिसांवर बेछूट आरोप करण्यास सुरुवात केली असतांना त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रियाही मंगळवारी अंमली पदार्थ विरोधी पथकाने पार पाडली. इफे ड्रीनच्या तस्करीसाठी एव्हॉनचा तत्कालीन संचालक मनोज जैन, पुनित श्रींगी आदीबरोबर केनिया, दुबई आणि मुंबईतील बैठकांना तो हजर होता. शेअर खरेदीचे ज्ञान अवगत असल्यामुळे एव्हॉनचे शेअर्स ममताच्या नावावर करण्याची प्रक्रियाही जयमुखीने सुरु केली होती. किशोर राठोड आणि संचालक मनोज जैन यांच्यात मध्यस्थाची भूमिकाही त्याने केली. गुजरातमध्ये पकडलेल्या १३०० किलो इफे ड्रीन प्रकरणातही त्याचा महत्वाचा सहभाग होता, असे अनेक आरोप पोलिसांनी यामध्ये केले आहेत.
* पुराव्यासाठी काय जोडले...
जयमुखीवरील आरोपपत्रासोबत पुराव्यासाठी पोलिसांनी ममता कुलकर्णी, किशोर राठोड, विकी गोस्वामी यांच्यात झालेल्या व्हॉटस्अॅप संभाषणाचा तपशीलही दिला आहे. त्यासाठी मोबाईल लोकेशन, डाटा आणि सीडीआरची माहितीही दिली आहे.
*ड्रग्जचा काळा पैसा कसा स्वीकारला. प्रत्येक बैठकीला जयमुखीने कशी महत्त्वाची भूमिका बजावली, याची तपशीलवार माहिती पोलिसांनी आरोपपत्रात दिली आहे.
* या आधी ९ जून रोजी याचप्रकरणी कंपनीचा व्यवस्थापक राजेंद्र डिमरी, निर्मिती व्यवस्थापक स्वामी, ठाण्यात इफेड्रीन विक्रीसाठी आलेले सागर पोवळे आणि मयूर सुखदरे या चौघांविरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल केले आहे.
* त्यापाठोपाठ २३ जून रोजी कंपनीचा संचालक मनोज जैन, सल्लागार पुनित श्रींगी, नरेंद्र काचा, नवी मुंबईचा हरदीप गिल आणि बाबा धोत्रे या पाच जणांविरुद्ध ३८५ पानांचे दुसरे आरोपपत्र दाखल केले होते.
* आता इफे ड्रीनची तस्करी करण्यात मोठा वाटा उचलणारा जयमुखी याच्याविरुद्ध हे तिसरे आरोपपत्र दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
इफेड्रीन प्रकरणात सुरुवातीला ठाणे पोलिसांनी अटक केलेले सागर पोवळे आणि मयूर सुखदरे यांनी ठाण्याच्या विशेष सत्र न्यायालयात जामीनासाठी सोमवारी अर्ज केला होता. मात्र, त्यांना जामीन मिळू नये यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे आग्रह धरला. यातील तीव्रता आणि आणि गांभीर्यता लक्षात घेऊन विशेष न्यायाधीश तथा जिल्हा सत्र न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांनी या दोघांचेही जामीन फेटाळले. त्यामुळे त्यांची पुन्हा न्यायालयीन कोठडीत अर्थात ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली आहे.