साथीच्या आजारांनी शहरात धारण केले रौद्र रूप
By Admin | Published: April 4, 2017 01:47 AM2017-04-04T01:47:08+5:302017-04-04T01:47:08+5:30
शहरातील विविध भागात शीतपेये आणि उघड्यावरील अन्नपदार्थ विक्रीचा धंदा तेजीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
पिंपरी : शहरात सध्या साथीच्या आजारांनी रौद्र रूप धारण केले असतानादेखील शहरातील विविध भागात शीतपेये आणि उघड्यावरील अन्नपदार्थ विक्रीचा धंदा तेजीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही उघड्यावरील अन्नपदार्थांची विक्री बिनदिक्कतपणे होत असताना, अन्न आणि औषध प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या उष्णतेची लाट सुरू असल्याने पारा चाळीस अंशापर्यंत चडला आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा असाह्य होत आहेत. उन्हाचा चटका सहन न झाल्याने दैैनंदिन व्यवहारासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची पावले आपोआप शीतपेयांच्या दुकानाकडे वळत आहेत. शहराच्या विविध भागांत अशी शीतपेयांची शेकडो दुकाने उभी करण्यात आली आहेत. मात्र, ही शीतपेये अनेक वेळा उघड्यावरच ठेवलेली असतात. या दुकानांमधील शीतपेये नागरिकांच्या आरोग्यास हितकारक आहेत की अपायकारक, याची पडताळणी अन्न आणि औषध प्रशासनाकडून करणे आवश्यक असते. त्यानंतरच परवाना दिला जातो. मात्र, शहरात सध्या सुरूअसणाऱ्या शीतपेयांच्या बहुतांश दुकानांची एफडीएकडून पाहणी करण्यात आलेली नाही. उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी लोकांकडून शीतपेयांनाचा प्रधान्य दिले जाते. वापरण्यात येणाऱ्या बर्फाची प्रतवारी एफडीएकडून तपासली जात नाही. त्यामुळे हा बर्फ खाण्यायोग्य आहे की नाही, याबाबत शंका निर्माण होत आहे. तसेच, शहरात एफडीएने परवाना दिलेले किती बर्फ कारखाने आहेत, याबद्दल खुद्द अन्न प्रशासनालाच माहिती नाही.
महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या पाण्यापासून अधिकृत बर्फ कारखान्यात बर्फ तयार केला जातो. हाच बर्फ खरेदी करणे आवश्यक असताना अनेक शीतपेये विक्रेते औद्योगिक कारणांसाठी वापरला जाणारा बर्फ खरेदी करून त्याची विक्री करीत आहेत. नागरिक मात्र याबाबत अनभिज्ञ असतात. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार अन्नपदार्थ आणि शीतपेयांची विक्री करणाऱ्या सर्वच फिरत्या विक्रेत्यांना एफडीएकडे नोंदणी बंधनकारक आहे. मात्र, अनेक विक्रे ते या परवानगीशिवाय खाद्यपदार्थांचा सर्रास धंदा करीत आहेत. रसवंती, बर्फगोळा, कुल्फी, उसाचा रस, मठ्ठा, थंड पाणी, कोल्ड्रिंक्स, ताक, लस्सी, सरबत, ज्यूस, आइस्क्रीम, फळे, फळांच्या फोडी, सॅलड, भेळपुरी, पाणीपुरी, शेंगदाणे, चाट विक्रेते, फास्ट फूड विक्रे ते यांची संख्या शहरात हजारोंच्या आसपास आहे. मात्र, एफडीएकडून यांची कधी तपासणी केली जाते की नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो. (प्रतिनिधी)
सध्या चायनीज फास्ट फूडचे फॅड शहरात सर्वत्रच पहायला मिळत आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत या चायनीज पदार्थांना पसंती दिली जाते. चौकात अथवा रस्त्याच्या कडेला हातगाडी लावून चायनीज पदार्थ विक्रीचा धंदा सुरू केला जातो. मात्र या हातगाड्यांची नोंदणी अन्न आणि औैषध प्रशासनाकडे केलेली नसते. या ठिकाणी बनविलेल्या पदार्थांचा दर्जाही एफडीएकडून तपासला जात नाही. अनेक चायनीज विक्रेते तेल, चिकन व इतर पदार्थ हे निकृष्ट दर्जाचे वापरत असतात. हे पदार्थ मानवी शरीरास अपायकारक असतात.