पारा चढल्याने तापाच्या रुग्णांत वाढ
By admin | Published: April 6, 2016 01:36 AM2016-04-06T01:36:34+5:302016-04-06T01:36:34+5:30
उन्हाचा चटका वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तापमानात अचानक वाढ झाल्याने विषाणूजन्य आजारांतही वाढ झाल्याचे दिसत आहे.
पुणे : उन्हाचा चटका वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तापमानात अचानक वाढ झाल्याने विषाणूजन्य आजारांतही वाढ झाल्याचे दिसत आहे.
या काळात वातावरणातील उष्णता एरवीपेक्षा जास्त असते. बाहेरील उष्णता वाढल्याने शरीराचे तापमानही वाढते. या तापमानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न शरीर करत असल्याने जास्त प्रमाणात घाम येतो. वातावरणातील उष्णतेने व्यक्तीच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. अशाप्रकारे शरीरातील पाण्याची पातळी खालावल्याने मेंदूतील थर्मोस्टॅटचे काम बिघडते आणि ताप येतो. हा ताप साधारण १२ तास राहतो व त्यानंतर कमी होतो, काही काळाने पुन्हा येतो. अशाप्रकारे बराच काळ शरीर बाहेरील तापमानाला प्रतिक्रिया देत असते. हा ताप लवकरात लवकर कमी होणे आवश्यक असते. तसे न झाल्यास व्यक्तीला उष्माघाताचा झटका येण्याची शक्यता असते,असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.
अशाप्रकारचा ताप आल्यास जास्तीत जास्त पाणी पिणे, शरीरातील क्षारांचे प्रमाण वाढविणे आणि अंग गार पाण्याने पुसून घेणे हे उपाय करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. लहान मुले व तरुणांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्याने अशाप्रकारचा विषाणूजन्य ताप येण्याचे प्रमाण त्यांच्यात जास्त असल्याचेही ते म्हणाले.
विषाणूजन्य आजारांबरोबरच उन्हाळ््यात गोवर, कांजिण्या यांसारख्या विषाणूजन्य आजारांची संख्याही वाढते. उन्हाचा तडाखा जास्त असल्यास या काळात पोट बिघडून गॅस्ट्रोसारख्या आजारांच्य रुग्णांतही वाढ होत असल्याचे जनरल फिजिशियन डॉ. अच्युत जोशी म्हणाले. उन्हाळ््याच्या काळात उघड्यावरील अन्नपदार्थ खाण्यात आल्यास अशाप्रकारचे त्रास उद्भवत असल्याचे ते म्हणाले.