खऱ्या अर्थाने ‘एक्सलन्स’चे युग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2017 01:40 AM2017-03-05T01:40:41+5:302017-03-05T01:40:41+5:30
‘लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स अॅवॉर्डस’चा सोहळा वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘हॉटेल ट्रायडंट’मध्ये नुकताच पार पडला. या सोहळ्यात, ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा
‘लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स अॅवॉर्डस’चा सोहळा वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘हॉटेल ट्रायडंट’मध्ये नुकताच पार पडला. या सोहळ्यात, ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उत्स्फूर्त प्रकट मुलाखत घेतली. मुख्यमंत्र्यांच्या हजरजबाबी उत्तरांना उपस्थितांनी मनमुराद दादही दिली. या सोहळ्याचा हा सविस्तर वृत्तान्त...
प्रश्न: तुम्ही विजयी वीरासारखे दिसत आहात, यामागे नेमके कारण काय?
उत्तर: नवी दिल्लीत एका निवडणुकीत अभिनेता शत्रुघ्न सिन्हा हरले. त्या वेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना चिठ्ठी लिहिली होती. चिठ्ठीत एक कविता होती, ती अशी की, ‘क्या हार में जीत में, किंचित नही भयभीत मैं, संघर्ष पथ पर जो मिला, ये भी सही वो भी सही’ या ओळींचा समावेश होता. (टाळ््या)
प्रश्न: या ओळींचा आशय तुम्ही शेर आहात, असे दर्शवितात का?
उत्तर: नाही, मी शेर नाही. सामान्य व्यक्ती आहे. मात्र, सामान्य व्यक्तीची साथ जनता देते, तेव्हा त्याच्यात शंभर वाघांचे बळ संचारते. मी मूळचा विदर्भाचा असल्याने, वाघ जंगलातला असो वा रस्त्यावरचा कोणत्याही वाघाला मी घाबरत नाही. (टाळ््यांचा कडकडाट)
प्रश्न: ग्रामीण जनतेत इतका विश्वास कसा निर्माण झाला?
उत्तर: सत्ता आल्यानंतर दोन वर्षे आम्ही दुष्काळाचा सामना केला, परंतु दुष्काळातून संधी निर्माण केल्या. सुरुवातीला उपहासाची स्थिती होती, परंतु आम्ही तालुका स्तरापर्यंत पोहोचलो. शेती, शेतकरी यांच्या विकासाकरिता विविध योजना व प्रकल्प राबविले. आम्ही राबविलेल्या जलयुक्त शिवार योजनेला तळागाळातून प्रतिसाद मिळाला. आजमितीस, या योजनेतून ६ हजार गावे दुष्काळमुक्त केली आहे. वर्षाखेरपर्यंत ११ हजार गावे दुष्काळमुक्त होतील. (टाळ््या)
प्रश्न: मुंबईत ३१ जागांवरून थेट ८१ चा पल्ला गाठणे ही सोपी गोष्ट नाही, ते कसे जमविले?
उत्तर: कठीण गोष्ट होती, पण आमची टीम तळागाळात जाऊन प्रयत्न करत होती. त्यामुळे मुंबईत अपेक्षित निकाल लागला. आमची जबाबदारी खऱ्या अर्थाने वाढली असून, सगळ््यांचीच झोप उडाली आहे. सामान्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी चार पटीने अधिक काम करावे लागेल. परिणामी, पाच वर्षांनंतर नक्कीच परिवर्तन घडेल.
प्रश्न: ज्योतिषशास्त्राचा आधारे विजयाचे भाकीत वर्तविले का? (हशा)
उत्तर: मी प्रचार करायला जातो, तिथे भाषण करताना लोकांच्या चेहऱ्यावरचे हास्याचे निरीक्षण नोंदवितो. भाषण करताना त्यांच्या डोळ््यांत पाहताना, ते आपले बोलणे सामान्य व्यक्ती ‘रिसिव्ह’ करताहेत का हे पडताळतो. भाषण करता-करता केलेल्या स्मित हास्याला सामान्यांकडून आलेला प्रतिसाद हीच माझी पोचपावती आहे, याच निकषांच्या आधारावर विजयाचे भाकीत केले होते. त्याला कोणत्याही ज्योतिषशास्त्राचा आधार
नाही. (हशा)
प्रश्न: दिल्लीत नरेंद्र
मोदी, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असे समीकरण झाले आहे का?
उत्तर: दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेवाद्वितीय आहे, ते पुन्हा होणे नाही. माझ्यासोबत निवडणुकांच्या कामात मोठी टीम काम करत होती, ती टीम चेहऱ्यासाठी भांडत नाही. टीमला माझा चेहरा दिला आहे, त्यासाठी ती काम करते. यात काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. मात्र, तेही लोक कोणतीही तक्रार न करता पक्षश्रेष्ठींचा आदेश मानून त्यानुसार काम करतात.
प्रश्न: खुर्ची असते, तेव्हा माणूस घाबरतो. मात्र, तुमच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही? (हशा)
उत्तर: मला काहीही गमवायची भीती नाही, त्यामुळे कसलीच काळजी नाही. दिशा योग्य आहे, लोकांचा विश्वासही मिळवला आहे. त्यामुळे आता जबाबदारीने कृतिशील काम करतो आहे. मी गेल्या दोन वर्षांत तीर मारले नाहीत. मात्र, परिवर्तन शक्य आहे, याची जाणीव समाजाच्या तळागाळात पोहोचली आहे. त्यामुळे याचीच प्रचिती निवडणुकांच्या निकालांत दिसून आली. (टाळ्या)
प्रश्न: शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाकरिता आपण कोणती धोरणे राबवित आहात?
शेतीच्या उत्पादकतेत गुंतवणूक वाढविण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत उत्पादकतेत गुंतवणूक होणार नाही, तोपर्यंत खर्च जास्तच राहणार, त्यामुळे हमी भाव कमी येणार. त्यामुळे आता कर्जाच्या अर्थव्यवस्थेतून गुंतवणुकीच्या अर्थव्यवस्थेकडे न्यायचे आहे. यासाठी वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेऊन कृषी समृद्धी योजना सुरू केली.
विदर्भात सीएसआरच्या माध्यमातून ५ कोटींची गुंतवणूक केली आहे. खऱ्या अर्थाने ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी २ हजार गावांना एकत्रित जोडले आहे. मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी ३४ गावांना जोडण्यात आले आहे. ‘टीव्ही फाय’ सुरू केले आहे. गावांना डिजिटल करून शाळा, दवाखाने जोडले आहेत.
टेलिमेडिसीनसह आदिवासींच्या वस्तूंना आॅनलाइन विक्री उपलब्ध करून दिली आहे. सध्या राज्यात ८ स्वयंचलित हवामान केंद्रे आहेत, पण आता मंडल स्थळापर्यंत जाऊन २ हजार हवामान केंदे्र तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तिथेच पाऊस, आर्द्रता समजू शकेल.
‘दीपोत्सव’चा अभिमान
‘लोकमत’चा दिवाळी अंक ‘दीपोत्सव’चा या प्रसंगी आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. वाचनसंस्कृती कमी होतेय, अशी ओरड होत असताना, त्या परिस्थितीत ‘लोकमत’च्या दिवाळी अंकाने ‘दीपोत्सव’ने सर्व प्रकारचे रेकॉर्ड्स मोडले. एका मराठी दिवाळी अंकाने गाठलेला हा पल्ला अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
‘मी तीर मारले नाहीत...’
दोन सव्वादोन वर्षांच्या कारकिर्दीत मी फार तीर मारलेले नाहीत. मात्र, लोकांचा विश्वास मी नक्कीच मिळवला आहे. लोकांच्या याच विश्वासाने परिवर्तन शक्य आहे. याची पोचपावती अलीकडे झालेल्या निवडणुकीतून मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी या स्पष्ट केले.
एकविसाव्या शतकाची परिभाषाच ‘एक्सलन्स’
आहे, त्यामुळे हे निश्चितच एक्सलन्सचे युग आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील ‘एक्सलन्स’ निवडून त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. जेणेकरून, आपल्या देशाचीही एक्सलन्सकडे वाटचाल होईल आणि ‘लोकमत’ समूहाने याचा आरंभ केला आहे, याचा आनंद आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.
उद्योगमंत्र्यांचे प्रोत्साहन मोलाचे - विजय दर्डा
‘लोकमत’च्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना प्रोत्साहन देण्याची परंपरा सुरूच असते. त्याचाच भाग म्हणजे ‘कॉपोर्रेट एक्सलन्स अॅवॉर्ड’ आहे. या दिमाखदार पुरस्कारांचे हे तिसरे वर्ष आहे. राज्यातील उद्योग व व्यवसाय क्षेत्रातील मान्यवरांना या माध्यमातून गौरवण्यात येते. या ‘लोकमत’च्या उपक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलेले प्रोत्साहन मोलाचे आहे. उद्योगमंत्र्यांनी वेळोवेळी दिलेली शाबासकीची थाप प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन ‘लोकमत’ समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी केले.
‘लोकमत’ एक्सलन्स अॅवॉर्ड्सच्या शानदार सोहळ््यात आपल्या मनोगतात दर्डा यांनी उद्योग व व्यवसाय क्षेत्रात, सुवर्ण कामगिरी करणाऱ्या हॉटेल उद्योजक विठ्ठल कामत, अभिनेते विवेक आॅबेराय, उद्योजिका वीणा पाटील, उद्योजक अमरिश पटेल यांच्या कामगिरीचा आवर्जून उल्लेख केला, तसेच ‘लोकमत’ समूहाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. त्यात देशातील सर्वांत महत्त्वाचे महिला विकास व्यासपीठ असणाऱ्या ‘सखी मंच’चे कौतुकही केले. या माध्यमातून महिला वर्गाचे नेतृत्व तयार होतेय, त्यांच्या समस्यांचा ‘आवाज’ आता त्याच होत आहेत, याचा आनंद आहे. समाजाच्या घटकांचा आवाज होणाऱ्या ‘लोकमत’ परिवाराचे अभिनंदन करून भविष्यातील प्रवासाविषयी दर्डा यांनी शुभेच्छा दिल्या.