उभारणी ते लिलाव... असा आहे जरंडेश्वर साखर कारखान्याचा खडतर प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 08:48 PM2021-07-01T20:48:03+5:302021-07-01T21:07:23+5:30

Journey of Jarandeshwar Sugar Factory : उभारणीपासून लिलावापर्यंत ‘जरंडेश्‍वर’ची न्यायालयीन प्रक्रियेतूनच वाटचाल

From erection to auction ... This is the arduous journey of Jarandeshwar Sugar Factory | उभारणी ते लिलाव... असा आहे जरंडेश्वर साखर कारखान्याचा खडतर प्रवास

उभारणी ते लिलाव... असा आहे जरंडेश्वर साखर कारखान्याचा खडतर प्रवास

googlenewsNext
ठळक मुद्दे वाढत्या वयात कारखाना शेतकर्‍यांच्या ताब्यात परत मिळवण्यासाठी माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांचे प्रयत्न

कोरेगाव : आपल्यासह अन्य सहकारी बँकांच्या थकीत कर्जापोटी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जप्त केलेल्या चिमणगाव, ता. कोरेगाव येथील जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा नाममात्र किंमतीत लिलाव करुन मुंबईच्या गुरु कमोडिटीज कंपनीला विकला होता. बँकेने अन्यायकारक भूमिका घेत कारखाना आपल्याकडून हिसकावून घेतल्याचा आरोप करत कारखान्याच्या संस्थापिका माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी गेली १८ वर्षे अविरत लढा दिला आहे.

 

विविध न्यायालयांमध्ये त्यांनी धाव घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत कारखाना परत मिळवायचाच, असा चंग त्यांनी या वयात सुध्दा बांधला आहे. डॉ. शालिनीताई पाटील यांनी कोरेगावसह खटाव तालुक्यात गावोगावी जाऊन भागभांडवल उभारत चिमणगावच्या माळावर साखर कारखाना उभा केला होता. कारखान्याच्या मंजुरीपासून लिलाव प्रक्रियेपर्यंत त्यांना प्रत्येक वेळी न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारखाना उभारणीस कर्ज देण्यास नकारघंटा वाजविल्याने त्यांनी राज्यातील इतर बँकांकडून कर्जे घेत कारखान्याची उभारणी केली, मात्र पहिल्याच गळीत हंगामापासून कारखाना विविध कारणांनी अडचणीत येत गेला. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी कारखान्याच्या मागची साडेसाती काही केल्या संपत नव्हती. कारखान्यातील कामगारांसह अन्य जवळच्या लोकांच्या नावावर विविध वित्तीय संस्थांकडून कर्जे उचलल्याने दरवर्षी कारखान्याची आर्थिक घडी विस्कळीत होत गेली, त्यातच कारखान्यातील कामगारांनी संघटना स्थापन केली, रायगड जिल्ह्यातील एका कामगार नेत्याने कारखान्यासाठी आंदोलन उभे केले आणि त्यातून कारखान्याचे दिवस फिरले. पश्‍चिम महाराष्ट्रात दोन व्हाईसचेअरमन असलेला हा एकमेव सहकारी साखर ठरला.

२१ नोव्हेंबर १९८९ साली नोंदणी

१९९९ मध्ये पहिला गळीत हंगाम

२००५ पर्यंत कारखाना शालिनीताई पाटील यांच्याकडे 

२००५ नंतर २०१० पर्यंत कारखाना भाडेतत्वावर

जून २०१० मध्ये राज्य बँकेने कारखाना ताब्यात घेतला, ऑगस्टमध्ये नोटीस काढली आणि डिसेंबर २०१० मध्ये लिलाव केला


आर्थिक आरिष्टात सापडल्यानंतर कारखाना चालविणे अवघड झाल्याने कारखाना भाडेतत्वावर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील मोठे साखर उद्योजक झुनझुनवाला यांनी काही काळ कारखाना चालविला, मात्र त्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर सहकारातील सर्वात मोठ्या वारणा समुहाने काही काळ कारखाना चालविला, मात्र संचालक मंडळासह कामगारांच्या कुरबुरीमुळे त्यांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागले. त्यांच्यानंतर सिध्दार्थ समुहाने काही काळ कारखाना चालविण्याचा प्रयत्न केला, मात्र ते देखील मधूनच व्यवस्थापन सोडून निघून गेले. अखेरीस राज्य सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी कारखान्याचा लिलाव केला, या लिलाव प्रक्रियेमध्ये भुईंजच्या किसनवीर साखर कारखान्याने सुरुवातीला भाग घेतला, मात्र त्यांनी ऐनवेळीस माघार घेतली. त्यानंतर मुंबईस्थित गुरु कमोडिटीज कंपनीने कारखाना लिलावात विकत घेतला.

ईडीची धडक कारवाई; अजित पवारांच्या नातेवाईकांच्या साखर कारखान्यावर जप्ती

या समुहाने मोठ्याप्रमाणावर कारखान्याचा विस्तार केला आहे, त्यांनी राज्यातील विविध सहकारी बँकांकडून मोठ्याप्रमाणावर कर्जे उचलली आहेत, राज्य बँकेने राबविलेल्या लिलाव प्रक्रियेच्या विरोधात डॉ. शालिनीताई पाटील यांनी गेली १८ वर्षे लढा उभारला आहे. कोरेगावच्या स्थानिक न्यायालयापासून उच्च न्यायालय आणि अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडीपर्यंत त्यांनी धाव घेतली आहे. आजही त्यांचा लढा कायम आहे. कोणत्याही परिस्थितीत कारखाना शेतकर्‍यांच्या स्वमालकीचा करण्याचा त्यांचा या वयातही निर्धार कायम आहे.

Web Title: From erection to auction ... This is the arduous journey of Jarandeshwar Sugar Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.