गल्लीबोळात दिसू लागलीय 'आर्चीची बुलेट' !
By admin | Published: May 13, 2016 10:34 PM2016-05-13T22:34:53+5:302016-05-13T22:38:07+5:30
गावागावात बाईकवरून फिरणारी आधुनिक आर्ची अनेकांच्या नजरेस पडू लागलीय
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 13- अवघ्या हिंदी सिनेसृष्टीपासून मराठी चित्रपटसृष्टीला वेड लावणा-या सैराटचा प्रभाव आता गावागावात पोहोचू लागला आहे. गावागावात सायकलऐवजी तरुणींचा बाईक शिकण्याकडे कल वाढू लागला आहे. आज थेट गावागावात बाईकवरून फिरणारी आधुनिक आर्ची अनेकांच्या नजरेस पडू लागलीय. गेल्या एक महिन्यापासून सातारा जिल्ह्यातील गावागावात मोटारसायकल चालविणा-या तरुणींच्या संख्येत कैकपटीने वाढ झाल्याची आश्चर्यकारक अन् धक्कादायक आकडेवारी लोकमतनं केलेल्या सर्वेक्षणात उघड झालीय. विशेष म्हणजे, ही सारी किमया सैराटचीच, अशी चक्क कबुलीही अनेक मुलींच्या पालकांनी मोठ्या कौतुकानं दिलीय.
शिक्षणासाठी रोज तालुक्याच्या गावाला जाणा-या तरुणींची संख्या जिल्ह्यात लाखोंमध्ये असली तरी स्वत:च्या गाडीवर कॉलेजला जाणा-या मुली तशा कमीच. ज्या गाडी चालवितात, त्यांच्या हातीही केवळ सायकल, स्कूटर किंवा मोपेडच असायची. मात्र दोन आठवड्यांपूर्वी नागनाथ मंजुळेंचा सैराट हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रच पालटलं. सैराटमधली बुलेट चालविणारी आर्ची पाहून साता-यात शेकडो तरुणी बाईक घेऊन रस्त्यावर दिसतायत. ज्या मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये दर महिन्याला सरासरी 10 ते 15 तरुणी मोपेड शिकायच्या, तिथंच गेल्या पंधरा दिवसांत 50पेक्षाही जास्त मुलींनी बाईकचं ट्रेनिंग घेतलंय. कौतुकाची गोष्ट म्हणजे, मुलींच्या या नव्या छंदाला त्यांच्या पालकांनीही मनापासून पाठिंबा दिलाय. विशेष म्हणजे बाईक चालविणा-या मुलींना जिन्स पॅन्ट घालून बाईकवर बसायला मस्त वाटतं. काही मुलींनी बाईक चालविण्यामुळं उलट आत्मविश्वास वाढल्याचंही म्हटलं आहे. बाईक मुलीही चालवू शकतात, हे आर्चीनं जगाला दाखवून दिल्याचं अनेक मुली म्हणाल्यात.
बाईक चालवण्याकडे मुलींचा वाढता कल
गेल्या पंधरा दिवसांत शंभरपेक्षाही जास्त तरुणींनी आमच्याकडे बाईक शिकण्याबाबत चौकशी केली. अनेक जणींनी शिकायलाही सुरुवात केली. आजपर्यंत केवळ स्कूटर शिकायला येणारा साता-यातील महिला वर्ग आता बाईककडे वळतोय, हे पाहून खूप बरं वाटलं. पुढच्या सहा महिन्यांत बाईक चालविणा-या मुलींची संख्या रस्त्यावर नक्कीच वाढलेली असेल.
- श्रुती कुलकर्णी, वाहन प्रशिक्षक, सातारा.