आरोग्यसेवा योजनांच्या अंमलबजावणीत त्रुटी
By admin | Published: January 17, 2017 03:00 AM2017-01-17T03:00:50+5:302017-01-17T03:00:50+5:30
आरोग्य सेवेसंदर्भातील सरकारी धोरण मुंबईत बसून ठरवले जाते.
डोंबिवली : आरोग्य सेवेसंदर्भातील सरकारी धोरण मुंबईत बसून ठरवले जाते. सर्व ठिकाणी सारखीच परिस्थिती नाही. या धोरणातील काही योजना चांगल्या असल्या, तरी त्यांची अंमलबजावणी योग्यरीत्या होत नाही, असे परखड मत डॉ. प्रकाश आमटे यांनी मांडले.
‘वैद्यकीय मदत निधी ट्रस्ट’चा आरोग्य सेवाव्रती पुरस्कार रविवारी डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांना प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले कलामंदिरात हा सोहळा झाला.
या वेळी ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी आमटे यांना बोलते केले. शाल, श्रीफळ, मान्यपत्र, धनादेश देऊन आमटे यांचा गौरव करण्यात आला. संस्थेचे विश्वास पुराणिक या वेळी व्यासपीठावर होते.
डॉ. आमटे म्हणाले की, ‘प्रत्येक ठिकाणच्या समस्या वेगळ्या आहेत. त्यांचा विचार करून धोरण ठरवले पाहिजे. कुपोषित बाळ व माता यांच्या मृत्यूचे प्रमाण पूर्वी खूप होते.
आता कमी झाले आहे. इकडे मुलामुलींना समान वागणूक असल्याने स्त्रीभू्रणहत्या लोकांना माहीत नाही. मुलामुलींना सारखी वागणूक असल्याने दोघांचे महत्त्व सारखेच आहे.’ डॉ. मंदाकिनी आमटे म्हणाल्या, ‘महिलांच्या जीवनात अनेक सुधारणा होत आहेत.
पूर्वी शिक्षणापासून दुर्लक्षित असलेल्या महिला आता मुलींना शिक्षण देऊ लागल्या आहेत. मुली शिक्षण घेऊ लागल्या असून त्याही आता फॅशन करू लागल्या आहेत.
आता बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. बाळंतपण हे नैसर्गिक पद्धतीने होते, असे सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्तावना विश्वास पुराणिक व सूत्रसंचालन डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी केले. (प्रतिनिधी)
>तरुणांनी सेवेसाठी पुढे यावे : ४३ वर्षांपूर्वी आम्ही गडचिरोलीत कामाला सुरुवात केली. तेव्हा अज्ञान व अंधश्रद्धा होती. ४३ वर्षांत आता तेथे रस्ते, रुग्णालय, वीज, पाणी, शाळा अशा सुविधा आहेत. तेथे डॉक्टर, शिक्षकांची गरज आहे. यासाठी महाराष्ट्रातील तरुणांनी आता पुढे यावे आणि एक वर्ष या सेवेसाठी द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.