प्रेमी युगुलाचे घरातून पलायन
By admin | Published: August 6, 2016 01:30 AM2016-08-06T01:30:11+5:302016-08-06T01:30:11+5:30
मुंबईच्या आकर्षणामुळे अनेक लहान मुले घरातून पळ काढत मुंबईत दाखल होतात.
मुंबई : मुंबईच्या आकर्षणामुळे अनेक लहान मुले घरातून पळ काढत मुंबईत दाखल होतात. अशी मुले रेल्वे स्थानकात सापडताच त्यांना पकडून पुन्हा पालकांच्या ताब्यात दिले जाते. अशाच एका घटनेत घरातून पळून आलेल्या १८ व १९ वयोगटातील प्रेमी युगुलाला दादर रेल्वे पोलिसांनी पकडून त्यांना पालकांच्या स्वाधीन केले. मुंबईच्या आकर्षणामुळे गाझियाबाद येथून त्यांनी पळ काढून मुंबई गाठली होती, अशी माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली.
३ आॅगस्टच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बोबडे हे दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन व चारवर गस्त घालत होते. त्याचवेळी त्यांना १८ ते १९ वयोगटातील तरुण व तरुणी दिसून आले.
त्यांच्याकडे बोबडे यांनी अधिक चौकशी केली असता समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे दोघेही घरातून पळून आले असावे, असा संशय बोबडे यांना आला. त्यांनी अधिक चौकशी केली असता आपले नाव अजीम नजीम (१९) आणि मुस्कान कदीम (१८) असून गाझियाबाद येथे राहणारे असल्याची माहिती दिली. अजीम हा इयत्ता बारावीत आणि मुस्कान ही अकरावीत शिकत आहे. ते दोघेही एकाच परिसरात राहणारे असून त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे. मुंबईचे आकर्षण व रोजगारासाठी त्यांनी मुंबई गाठली होती, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांकडून देण्यात आली. त्यांनी दोन्ही मुलांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.